

पिंपरी: गणेशोत्सवासाठी महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे. मूर्तींना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त आहेत. त्यांचे सर्व लक्ष आता मूर्तीला आकर्षक बनविण्याकडे लागले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कारखान्यांमध्ये मूर्ती घडविण्याचे काम सुरू आहे. गणेशभक्तांनी त्यांना हव्या असलेल्या गणेशमूर्तींची आगावू नोंदणी केली आहे. जून महिन्यापर्यंत कच्च्या मूर्ती तयार करून सुकविण्याचे काम सुरू होते. आता सुकलेल्या मूर्तींना रंग देण्याबरोबरच कुंदन, टिकल्या, मोती वापरून मूर्तीला आकर्षक बनविण्यात येत आहे. (Latest Pimpri News)
सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती, घरगुती गणेशमूर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी कारागीर झटत आहेत. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक सजावट यामुळे यंदाच्या मूर्तीची शैली वेगळी ठरत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भक्तांकडून शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जाते. त्यानुसार, शाडूच्या मूर्ती उपलब्ध आहेत. सार्वजनिक मंडळांसाठी पीओपीच्या मूर्तींचे काम सुरू आहे. यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे मूर्ती सुकविण्यासाठी वेळ लागल्याचे कारागीर सांगतात.