पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दिवाळीनंतर होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तयारीस वेग आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका वरिष्ठ अधिकार्यांची नोडल अधिकारी आणि सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे निवडणूक संदर्भात वेगवेगळ्या कामाची जबाबदारी आयुक्त शेखर सिंह यांनी सोपविली आहे.
निवडणूक कार्यालय, अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्तीचे व्यवस्थापन, मतदान केंद्रांची व्यवस्था, आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था राखणे, साहित्य वितरण, प्रशिक्षण, ईव्हीएम मशिनचे वितरण, वाहन पुरवठा व वाहतूक व्यवस्था, आयटी व्यवस्थापन, मीडिया व प्रचार नियंत्रण, तसेच मतदार तक्रार निवारण, मतमोजणी आराखडा, स्ट्रॉग रूम, मतमोजणी, निवडणूक निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, स्वीप व्यवस्थापन, निवडणूक खर्च, कर्मचारी मानधन, टपाली मतपत्रिका, टपाली मतदान कक्ष, मतपत्रिका छपाई, विविध परवाना एक खिडकी कक्ष, न्याय विधी कक्ष, दिव्यांग मतदार कक्ष आदी प्रकारचे निवडरूक कामकाज आहे. त्यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Latest Pimpri News)
निवडणूक काळात अचूक व पारदर्शक पद्धतीने कामकाज पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची तर, आयटी विभागासाठी विशेष तांत्रिक अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणुकीसंबंधी सर्व साहित्य वेळेत व सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी स्वतंत्र जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी नोडल अधिकारी कार्यरत राहणार आहेत.
महापालिका निवडणूक पारदर्शक, शांततामय व सुरळीतरीत्या व्हावी, यासाठी प्रशासनाकडून सर्व स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. नोडल अधिकार्यांच्या नियुक्तीमुळे समन्वय वाढून निवडणुकीचे कामकाज सुलभ होणार असल्याचा दावा आयुक्त सिंह यांनी केला आहे.
या वरिष्ठ अधिकार्यांकडे निवडणुकीचे कामकाज
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व कार्यकारी अभियंता महेश बरींदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी म्हणून उपायुक्त आयुक्त संदीप खोत यांची नियुक्ती झाली आहे. सहायक आयुक्त मुकेश कोळप, नियुक्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सहआयुक्त मनोज लोणकर, मतदार यादीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि आचार संहिता व्यवस्थापन कामकाजासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती केली आहे.
मतदान केंद्र, स्थापत्य व विद्युत व्यवस्था शहर अभियंता मकरंद निकम, ईव्हीएम व वितरण व्यवस्था मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, वाहतूक व्यवस्था सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, मतमोजणी व स्ट्राँग रुम व्यवस्थापन तसेच, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन यासाठी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष व स्वीप व्यवस्थापन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, निवडणूक खर्च व्यवस्थापनासाठी मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्मचारी मानधन वाटप कक्ष मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, निवडणूक साहित्य व स्टेशनरी व्यवस्थापन उपायुक्त नीलेश भदाणे, टपाली मतपत्रिका उपायुक्त सचिन पवार, मतपत्रिका छपाई मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, विविध परवाना एक खिडकी योजना कक्ष व न्याय विधी कक्ष उपायुक्त राजेश आगळे आणि कम्युनिकेशन प्लॅन नगर रचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार मदत केंद्र तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष व कॉल सेंटर सहायक आयुक्त उमेश ढाकणे, दिव्यांग मतदार कक्ष, कर्मचारी कल्याण कक्ष उपायुक्त ममता शिंदे, प्राथमिक आरोग्य सुविधा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, संगणकीय कामकाज कक्ष मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, बैठक नियोजन अतिवृत्त कक्ष उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व दूरसंचार सुविधा कक्ष सहशहर अभियंता माणिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही राखीव कामकाजासाठी अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
प्रभाग रचनेवर आत्तापर्यंत आठ हरकती
महापालिकेने शुक्रवारी (दि.22) चार सदस्यीय प्रारूप 32 प्रभागरचना जाहीर केली. प्रभागरचना महापालिकेचे संकेतस्थळ तसेच, महापालिका भवनात लावण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर शुक्रवार (दि.29) पर्यंत एकूण 8 हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती व सूचना येत्या गुरुवार (दि.4) पर्यंत नोंदविता येणार आहेत, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.