

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती संकलन उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरातून शुक्रवार (दि. 29) पर्यंत 4 हजार 032 मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. त्यात शाडूमातीच्या 822 तर, पीओपीच्या 3 हजार 210 मूर्ती आहेत.
शहरातील सर्व विसर्जन घाटांवर घरगुती गणपतीचे नदीत विसर्जन न करता त्यांचे संकलन केले जात आहे. विसर्जनासाठी आलेल्या पीओपी व शाडू मातीच्या मूर्तीची नोंद ठेवली जात आहे. मूर्तींचे संकलन झाल्यानंतर मूर्ती बंद टेम्पोत भरून नेल्या जात आहेत. (Latest Pimpri News)
त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात येत आहे, असा दावा अधिकार्यांनी केला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांचे पथक हा उपक्रम राबवित आहे.
नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन करताना मूर्ती संकलन केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय मूर्ती संकलन
अ- 14, ब - 625, क - 874, ड- 880,, फ- 227, ग- 714, ह - 364