Metro Project Pudhari
पिंपरी चिंचवड

Nigdi Chakan Metro: निगडी-चाकण मेट्रोला पुन्हा ‘ब्रेक’; उपसूचनांनंतरच डीपीआरला अंतिम मंजुरी

भाजपच्या उपसूचनेला सर्वसाधारण सभेची मंजुरी; महामेट्रोला आणखी २ ते ३ महिने प्रतीक्षा, १२,९३७ कोटींच्या प्रकल्पात ३४ स्थानके

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: निगडी ते चाकण या मार्गाच्या सुधारित डीपीआरला मान्यता देण्यापूर्वी शहर सुधारणा समितीमध्ये नगरसेवकांनी दिलेल्या असंख्य उपसूचनांना मंजुरी देऊन, ते बदल मान्य केल्यानंतर कार्यवाही करावी, अशी उपसूचना सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभेत मंजूर केली आहे. त्यामुळे डीपीआर मंजुरी मिळण्यासाठी महामेट्रो व्यवस्थापनाला आणखी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निगडी ते चाकण या 47.295 किलोमीटर अंतराच्या 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये खर्चाच्या एलिव्हेटेड मेट्रो मार्गाच्या डीपीआरला उपसूचनेसह सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. सभेत वन के अंतर्गत हा विषय दाखल करून घेण्यात आला. या प्रकल्पात पिंपरी-चिंचवडमध्ये 28 तर, एकूण 34 मेट्रो स्टेशन असतील. त्यात महापालिकेचा 330 कोटींचा हिस्सा तर, केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रत्येकी 1 हजार 721 कोटी 71 लाख रुपयांचा हिस्सा असेल. हा सुधारित डीपीआर तयार करून महामेट्रोने पालिका आयुक्तांकडे 26 फेब्रुवारी 2026 ला सादर केला. त्यासंदर्भात नगरसेवकांसमोर दोनदा सादरीकरण करण्यात आले. सर्वसाधारण सभेत डीपीआरला अनेक नगरसेवकांनी उपसूचना दिल्या. आमच्या भागातून मेट्रो न्या. स्टेशनचे नाव बदला. दोन मेट्रो मार्ग एकमेकांना मिळतात त्या स्टेशनवर स्वतंत्रपणे ये-जा करण्यासाठी प्रवेशद्वार उभारा. पुणे ते आळंदी, निगडी ते गोडाऊन चौक अशी मेट्रो न्या, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

निगडी ते चाकण हा मेट्रो मार्ग ज्या ठिकाणी एकमेकांना जोडला जातो, तेथील स्टेशनवर ये-जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सोय करावी. विशालनगर कॉर्नर ते कोकणे चौक या स्टेशनदरम्यान, औंध-रावेत बीआरटी मार्गालगत अतिरिक्त स्टेशन उभारण्यात यावे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनवरून वल्लभनगरचे स्टेशन महेशनगर कॉर्नरकडे स्थलांतरित करून स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी किंवा मगर स्टेडियम येथे बांधण्यात यावे, अशी उपसूचना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली. भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते गोडाऊन चौक या स्पाईन रस्त्यावर मेट्रो मार्गिका तयार करा, अशी उपसूचना नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी दिली. पिंपळे निलख येथील विशालनगर कॉर्नरऐवजी कस्पटे चौक मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात यावे, अशी उपसूचना संदीप कस्पटे यांनी दिली.

शहर सुधारणा समितीकडे सर्व उपसूचना तसेच, सूचना जमा केल्या जाणार आहेत. सूचना स्वीकारून तसे बदल करण्यास मान्यता मिळाल्यानंतरच सुधारित डीपीआरला मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अशी उपसूचना सत्ताधार्‍यांनी मंजूर केली. त्यामुळे डीपीआरला पालिका सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळण्यासाठी महामेट्रो व्यवस्थापनाला २ ते ३ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भोसरी उड्डाण पूल न पाडता दुसर्‍या मार्गाने मेट्रो न्या

भोसरी येथील उड्डाण पूल न पाडता निगडी ते चाकण मेट्रो मार्ग पूर्वीच्या डीपीआरनुसार गवळीमाथा ते गोडाऊन चौक या मार्गाने नेण्यात यावा. मार्गिका तयार करताना 61 मीटर जागेचा वापर करावा. मेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी डीपीतील मुख्य व अंतर्गत रस्ते विकसित करण्यात यावेत. आवश्यकतेनुसार जोड रस्ते, पर्यायी वाहतूक मार्ग व वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन करून, ते काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो मार्गिकेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी, अशी उपसूचना देण्यात आली आहे.

पुणे-आळंदी मेट्रो सुरू करा

पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या आळंदी परिसराचा मोठा विकास होत आहे. तेथे लोकवस्ती वाढत असून, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर तीर्थक्षेत्रास लाखो भक्त नियमितपणे भेट देतात. सद्यस्थितीत या मार्गावर दररोज 700 ते 800 पीएमएपीएल बसच्या फेर्‍या होत आहेत. त्यामुळे या मार्गावर मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज असून, या मार्गावर मेट्रो सुरू करावी, अशी उपसूचना माजी महापौर नितीन काळजे, ज्ञानेश्वर जगताप आणि कुशाग्र कदम यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT