Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

NigdI Chakan Metro: निगडी-चाकण मेट्रोसाठी भोसरीचा उड्डाण पूल पाडणार; १२,९३७ कोटींच्या सुधारित डीपीआरला वेग

४७.२९५ किमीचा मेट्रो मार्ग; ३४ स्थानके प्रस्तावित, एनएचएआयच्या आठपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी पूल हटविणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते चाकण असा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने (एनएचएआय) नाशिक फाटा ते खेड असा 30 किलोमीटर लांबीचा आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेला भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. पिंपरी ते निगडी विस्तारीत मार्गाचे काम सुरू आहे. ते काम 50 टक्क्यांहून अधिक झाले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा 45.295 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा उर्वरित संपूर्ण भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड आणि चाकण एमआयडीसी मेट्रोने जोडली जाणार आहे. या मार्गाचा तब्बल 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये खर्चाच्या सुधारित डीपीआरला महामेट्रोने तयार करून पालिकेकडे फेब्रुवारी 2026 ला सादर केला आहे. त्या संदर्भात महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादरीकरण केले.

मेट्रोच्या डीपीआरबाबत माहिती देताना महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की, महामेट्रोने सुधारित डीपीआर पालिकेस सादर केला आहे. त्यावर लोकप्रतिनिधींसमोर 27 जुलैला सादरीकरण करण्यात आले. सुधारित डीपीआर 47.295 किलोमीटर अंतराचा आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 28 आणि चाकण नगरपालिका हद्दीत एकूण 6 असे एकूण 34 मेट्रो स्टेशन असणार आहेत. त्यात महापालिकेचा हिस्सा एकूण 330 कोटी रुपयांचे असणार आहे.

तर, नाशिक फाटा ते खेड या मार्गावर एनएचएआयकडून आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने 7 हजार 827 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. त्या कामासाठी भोसरी येथील उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रोऐवजी एनएचएआयकडून भोसरीचा पूल पाडला जाणार हे स्पष्ट झाले आहे.

भोसरी येथील उड्डाण पूल पाडण्यास महापौर रवी लांडगे यांचा विरोध आहे. पूल ठेवून पर्यायी बाबीचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र, पूल पाडण्यात येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल. सुधारित डीपीआरबाबत नगरसेवकांसमोर पुन्हा सादरीकरण केले जाणार आहे. त्यात उपसूचनेनुसार डीपीआरमध्ये बदल केला जाईल, असे महापौर रवी लांडगे यांनी दावा केला आहे.

नवा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती येथून ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक वाकडपर्यंत जाईल. तेथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गावरील वाकड स्टेशनला मेट्रो बदलता येईल. येथून विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाता चौक, सेन्चुरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी से.क्र. 1, भोसरी एमआयडीसी, गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडीवरून चाकणपर्यंत.

सुधारित ‘डीपीआर’मधील चित्र

  • पिंपरी-चिंचवडमध्ये स्टेशन-28

  • चाकण नगरपालिका हद्दीतील स्टेशन- 6

  • एकूण स्टेशन-34

  • अंतर -47.295 किमी.

मार्ग- उन्नत (एलिव्हेटेड)

  • एकूण खर्च- 12 हजार 937 कोटी 23 लाख रुपये

  • पिंपरी-चिंचवड पालिकेचा हिस्सा-330 कोटी रुपये

  • केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सा-प्रत्येकी 1 हजार 721 कोटी 71 लाख रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT