Reckless Driving Black Film Vehicles Pudhari
पिंपरी चिंचवड

Reckless Driving Black Film Vehicles: नवलाख उंबरेत बेफाम वाहनचालकांचा धुमाकूळ

ब्लॅक फिल्म, बिना नंबर प्लेट गाड्यांचा त्रास; पोलिसांकडून कारवाई सुरू

पुढारी वृत्तसेवा

नवलाख उंबरे: नवलाख उंबरे आणि परिसरात सध्या एक चिंताजनक चित्र समोर आले आहे. रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या ब्लॅक फिल्मिंग केलेल्या, बिना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची दिशा काहीतरी वेगळेच चित्र दाखवत आहे. पण हा केवळ वाहतूक नियमभंग आहे की, राजकीय वरदहस्ताखाली चाललेले काही दडपशाही प्रकार, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. त्यामुळे परिसरात एक प्रकारचा अदृश्य तणाव निर्माण झाला आहे.

वाहनांवरील काळ्या काचा इतक्या गडद असतात की आत कोण आहे, किती जण आहेत, हे ओळखणे अशक्य होते. नंबर प्लेट नसल्यामुळे तर त्यांचा मागोवा घेणे जवळपास अशक्यच ठरत आहे. याचबरोबर आणखी एक गंभीर बाब समोर येत आहे. महाविद्यालयीन तरुणांकडून वाढत चाललेली बेफिकीर वाहनचालकांची प्रवृत्ती. मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, इन्स्टाग््राामवरील रिल्स पाहत वाहन चालवणे, एका गाडीवर तिघेजण बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करणे, गाडीचा आवाज जाणीवपूर्वक वाढवून स्टंटबाजी करणे, तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून नियमांना हरताळ फासणेअशा प्रकारांनी परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. या सर्व प्रकारात वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने असे प्रकार वाढताना दिसून येत आहेत.

महाविद्यालयीन परिसरात वाढला वावर

शक्यतो महाविद्यालयांच्या परिसरात या गाड्यांचा अधिक वावर असल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नियमांचे उघड उल्लंघन आणि पोलिसांचा कमी भासणारा वचक यामुळे काही तरुणांकडून बेधडकपणे कायद्याला आव्हान दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर योग्य ते लक्ष ठेवण्यात येत आहे आणि योग्य ती कठोर कारवाई केली जात आहे, तरीसुद्धा मावळमधील शांत वातावरणाच्या आड काहीतरी वेगळे शिजतंय का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

..अशा वाहनांवर होणार कारवाई

सध्या या प्रकरणात ठोस उत्तर समोर आले नसले, तरी पोलिस यंत्रणा परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत असून, योग्य दिशेने तपास सुरू आहे. बेजबाबदार कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करत, अफवांवर विश्वास न ठेवता जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना दिला जात आहे.

आम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. संशयास्पद हालचालींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवत आहोत. नियमितपणे अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. कोणी अशा प्रकारचे वाहने रस्त्यावर चालवत असतील तर तात्काळ तळेगाव वाहतूक विभाग येथे संपर्क करावा.
गणेश लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.
विद्यार्थ्यांनी गाडी चालवताना जी काळजी घेतली पाहिजे ती विद्यार्थी घेत नाहीत. उगाच स्टंटबाजी करताना कोणाच्या जीवाला धोका नको म्हणून कारवाई होणे गरजेचे आहे.
ॲड. सागर शेटे, स्थानिक नागरिक
हे फक्त नियमभंग नाही. जर एखादी गाडी अपघात करून पळून गेली किंवा एखादा गुन्हा झाला, तर आपण काहीच करू शकणार नाही.
नाना ढोरे, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT