नाशिक फाटा चौकात उभारला जाणार बहुप्रवासी पादचारी पूल Pudhari
पिंपरी चिंचवड

Nashik Phata Foot Over Bridge: नाशिक फाटा चौकात उभारला जाणार बहुप्रवासी पादचारी पूल

महामेट्रोकडून कामाला गती; 20 कोटी खर्चाचा प्रकल्प पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, एसटी, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, सुरक्षितपणे स्टेशन व थांब्यांपर्यत तसेच, रस्त्याच्या पलीकडे पोहचण्यासाठी महामेट्रोकडून कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात फूट ओव्हर बिज (पादचारी पूल) उभारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ सहजपणे घेता येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी उभारलेला तो शहरातील पहिला पादचारी सेतू ठरणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)

नाशिक फाटा चौकात निगडी ते दापोडी दुहेरी बीआरटी मार्ग आहे. भोसरी, चाकण ते पुणे अशी बस सेवा आहे. कासारवाडी रेल्वे स्टेशन आहे. पुणे-नाशिक महामार्ग असल्याने तेथील एसटी थांब्यावरून नाशिकला ये-जा करता येते. मेट्रोचे नाशिक फाटा स्टेशन या चौकात आहे. जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून कासारवाडीहून भोसरीला जाता येते. तसेच, उड्डाण पुलावर नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे या चौकातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात.

या चौकात पादचारी व प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी तसेच, स्टेशन व थांब्यांवर ये-जा करण्यासाठी सुरक्षित असा स्वतंत्र मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून

ये-जा करावी लागते. त्यात अपघात होण्याचा धोका अधिक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून येथे पादचारी पूल उभारण्यात येणार होता. मात्र, महामेट्रोने त्यासाठी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामही सुरू केले.

पादचारी पूल उभारण्याचे काम वायएफसी-बीबीजी जेव्ही या ठेकेदाराकडून 1 जून 2025 ला सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 20 कोटी 89 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या कामास महापालिकेने 25 फेबुवारी 2025 ला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण 37 टक्के काम झाले आहे. कामाची मुदत सव्वावर्षे आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नागरिक व प्रवाशांना या चौकातून सुरक्षित ये-जा करता येणार आहे. हा या संकल्पनेवर आधारित शहरातील पहिला पादचारी सेतू ठरणार आहे.

चौक सिग्नल फ्रीचा निर्णय रद्द

निगडी ते दापोडी ग्रँड सेपरेटर मार्ग बनविताना पालिकेने 12.50 किलोमीटर अंतराचा मार्ग सिग्नल फ्री करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रोचे काम संपल्यानंतर नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, तो चौक सिग्नल फ्री करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे आता सांगितले जात आहे. कासारवाडीतून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपीमधून अनेक प्रवासी ये-जा करतात. चौक सिग्नल फ्री केल्याने तेथील नागरिकांना बसचा लाभ घेता येणार नाही. वाहनांची वाढलेल्या संख्येचा विचार करुन तो चौक सिग्नल फी करण्यात येणार नाही, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने स्पष्ट केले आहे.

चौकात पुलांची गर्दी

नाशिक फाटा चौकात अक्षरश: पुलाची गर्दी झाली आहे. कासारवाडीहून भोसरीकडे जाणारा अर्धवर्तुळाकार उड्डाणपूल आहे. भोसरी-पिंपळे गुरव या भागांना जोडणारा रेल्वे मार्ग व पवना नदीवर उड्डाणपूल आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवहून आलेले वाहनांसाठी रॅम्प तसेच, लूप आहे. हा दुमजली उड्डाणपूल महापालिकेने जागतिक बँकेकडून 159 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज घेऊन बांधला आहे. त्या चौकात आता मेट्रो मार्गिकेचा उंच पूल आहे. पादचारी पुलामुळे आणखी एका नव्या पुलाची चौकात भर पडणार आहे. परिणामी, चौकांत अनेक पुलांची गर्दी होणार आहे.

मेट्रोच्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक सुविधा

महामेट्रोकडून हा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. हा पूल भारतरत्न उद्योजक जेआरडी टाटा उड्डाणपूल, तेथील बीआरटी मार्गावरील बस थांबे, नाशिक फाटा चौकातील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड, नाशिक फाटा मेट्रो स्टेशन, बीआरटीचे दोन्ही बाजूचे थांबे, कासारवाडी रेल्वे स्टेशनला जोडणारा हा पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर पूल असणार आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार

दापोडी ते निगडी बीआरटी बस, नाशिक फाटा ते वाकड बीआरटी बस, रेल्वे, मेट्रो तसेच, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, असा पादचारी पूल उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोस सांगितले आहे. महापालिका, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून हा पूल उभारण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे धोकादायकरित्या रस्ता ओलांडण्याचा प्रकार पूर्णपणे थांबणार आहे, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT