मुळा-मुठा-पवना नद्यांचे आरोग्य धोक्यात; शहराच्या जीवनवाहिन्या होताहेत मृतप्राय Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune River Pollution: मुळा-मुठा-पवना नद्यांचे आरोग्य धोक्यात; शहराच्या जीवनवाहिन्या होताहेत मृतप्राय

औद्योगिक सांडपाणी, कचरा आणि रसायनांचा मारा; पाण्याऐवजी वाहतोय दुर्गंधीयुक्त काळपट प्रवाह

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे निलख : पिंपरी-चिंचवडच्या जीवनवाहिन्या असलेल्या मुळा, मुठा आणि पवना नद्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. पाणी नव्हे, तर काळपट, दुर्गंधीयुक्त रसायनांचा प्रवाहच त्यात वाहताना दिसतो. नद्यांचे पात्र सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि प्लास्टिकने भरले आहे. परिणामी, शहराच्या फुफ्फुसासारख्या या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.(Latest Pimpri chinchwad News)

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातून वाहणाऱ्या पवना नदीत सांडपाणी आणि रसायनमिश्रित प्रवाह सोडले जात असल्याने नदीच्या पृष्ठभागावर फेसाळ पांढरा थर, तर किनाऱ्यावर घनकचऱ्याचे ढीग दिसतात. परिसरात पसरलेली दर्पयुक्त हवा इतकी तीव्र झाली आहे की नागरिकांना खिडक्या, दारं बंद ठेवणं हेच एकमेव पर्याय उरला आहे.

मुठा नदीकाठावरील अनेक ठिकाणी प्लास्टिक, थर्माकोल, पूजा साहित्य आणि बांधकामाचा अवशेष असा मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या ठिकाणी नदीपात्रातच कचरा जाळण्याचे प्रकार होत असून त्यामुळे प्रदूषण आणखी तीव्र झाले आहे. काही भागांत नदीचा प्रवाहच बदलल्यासारखा दिसतो.

घाट परिसरात दुर्गंधीची परिसीमा

बाणेर घाट परिसरातील मुळा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी फैलावली आहे. घाटावर उभा राहून मोकळा श्वास घेऊ म्हणले तर नाक, तोंड दाबून येथून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक व कुजलेल्या अवशेषांमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांना तोंडावर रुमाल बांधावा लागत आहे.

प्रदूषणामुळे वाढला रोगराईचा धोका

दूषित पाणी आणि परिसरातील कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा आणि त्वचारोग यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दूषित वातावरणामुळे लहान मुले आणि वृद्ध नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. पाण्याची गुणवत्ता सुधारली नाही, तर पुढील काही वर्षांत नदीलगतचा परिसर आजारांचे केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही.

नदी नव्हे, ‌‘सांडपाणी वाहिनी‌’

नद्यांच्या या अवस्थेकडे पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नदी स्वच्छतेचे फोटोसेशन सुरू असताना प्रत्यक्षात मात्र नदी जीवनवाहिनी नव्हे, सांडपाणी वाहिनी बनली आहे, ही वस्तुस्थिती दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

या प्रकरणी विभागीय कर्मचारी लगेचच पाहणी करतील. तसे आढळल्यास संबंधित ठिकाणी पथक पाठवून तात्काळ साफसफाई करण्यात येईल. यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारींवर आम्ही कठोर कार्यवाही केली आहे.
हरविंदर बंसल, विभागीय अधिकारी, पर्यावरण विभाग, मनपा
मुळा नदीवरील बाणेर-वाकडला जोडणाऱ्या पुलावर कचरा डंपिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. परत तसे निदर्शनास आल्यास संबंधितांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. तसेच रात्री किंवा पहाटे जेथे कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी नियमित पाहणी सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
शांताराम माने, आरोग्य अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT