

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकास 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी (दि. 2) रंगेहात पकडले.(Latest Pimpri chinchwad News)
प्रमोद रवींद्र चिंतामणी (44, रा. 504, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे या लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी (दि. 3) एसीबीच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता 51 लाख रोख सापडल्याची माहिती समोर आली आहे. या पैशांसह दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे एसीबीने जप्त केली आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांचीदेखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
प्रमोद चिंतामणी याने 2 कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले. रात्री उशिरा याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी त्याच्या घरझडतीत मिळालेल्या रोख रकमेसह अन्य कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती. पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंतामणी याने लाचेची मागणी करताना 1 कोटी त्याच्यासाठी व 1 कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी मागितले होते, त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.