Engineer Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Municipal Engineer Suspension: महापालिका कार्यकारी अभियंता, उपअभियंत्याचे निलंबन

भाजप नगरसेवकाच्या मुख्यमंत्र्यांकडील तक्रारीवरून आयुक्तांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिक रक्कमेची मागणी केल्याची तक्रार भाजपच्या एका नगरसेवकाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांचे शुक्रवारी (दि. 11) निलंबन केले आहे. त्यांची विभागीय चौकशी करून 15 दिवसांत दोषारोपपत्र सादर करा, असे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.

या प्रकरणी दैनिक पुढारीने बांधकाम परवानगी विभागातील गैरव्यवहारबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, असे वृत्त गुरूवारी (दि.10) प्रसिद्ध केले होते. सत्ताधारी भाजपचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार हिंगे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीनुसार तत्काळ चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

पुनावळे येथील निवासी व वाणिज्य इमारतींच्या बांधकामास बांधकाम परवानगी देण्यात आलेली असून, भोगवटा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणार्‍या प्रशसन शुल्काबाबतच्या अ आणि ब प्रपत्राच्या रकमेमध्ये तफावत आढळत असल्याने कार्यकारी अभियंता सोनवणे व उपअभियंता मोरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता.

त्यानी समर्पक खुलासा न केल्याने विभागप्रमुखांनी खुलासा समाधानकारक नसल्याचे कळवले आहे. त्यावरून दोन्ही अधिकार्‍यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3(1) (एक) (दोन) (तीन) मधील तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्यांचे निलंबन केले आहे. त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करावी. त्यांच्याविरुद्ध 15 दिवसांत दोषारोपपत्र ठेवण्यात यावे, असे आदेश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT