लोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीतील आडोशी बोगदा या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रोपलेन गॅसवर करणारा एक टँकर उलटल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली होती. तब्बल 33 तासांच्या अथक परिश्रमानंतर सदरच्या टँकर मधील अतिशय ज्वलनशील असलेला हा गॅस अन्य चार टँकर मध्ये वर्ग करण्यात आला व तदनंतर सदरचा टँकर मार्गातून बाजूला केल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास म्हणजेच तब्बल 36 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वरील वाहतूक ही पूर्वपदावर आली आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर मध्ये अतिशय ज्वलनशील असा वायू असल्यामुळे व तो तीन ठिकाणाहून लिकेज झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग आडोशी बोगद्यापासून बंद करण्यात आला होता. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केमिकल एक्सपर्ट टीम या अपघातग्रस्त टँकरच्या ठिकाणी दाखल झाल्या. रात्री साडे अकराच्या सुमारास अन्य काही टीम त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी सदर लिकेज काढण्याचा प्रयत्न केला मात्र सकाळपर्यंत त्यांना पूर्णतः यश आले नाही.
सकाळी पुन्हा नव्याने काही टीम दाखल झाल्या व अपघातग्रस्त टँकर मधील वायु लिकेज रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुपारी चार नंतर या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन ही पुणे मार्गिके वरून सुरू करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरल्यामुळे एक्सप्रेस वे वर 35 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. जुन्या मार्गवर देखील कामशेत पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. मुंबईच्या दिशेला देखील काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
अतिशय महत्त्वाच्या व जलद गती मार्ग समजल्या जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ही अघोषित आणीबाणी लागू झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पिण्याचे पाणी व खाण्यापिण्या वाचून प्रवाशांना या वाहतूक कोंडीमध्ये तब्बल 12 ते 18 तास एकाच जागेवर अडकून पडावे लागले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी नियंत्रणामध्ये आले तरी दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. टँकर मधील पूर्ण गॅस वर्ग केल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदरचा गॅस टँकर उभा करत मार्गावरून बाजूला करण्यात आला व तदनंतर मुंबई मार्गिका सुरू करण्यात आली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घाट परिसरामधील वाहतूक पूर्व पदावर आली होती. तब्बल 36 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने मोकळा श्वास घेतला. असे असले तरी 18 ते 20 तास एकाच जागेवर वाहने उभी असलेले अनेक वाहनचालक रात्री गाड्या बंद करून मार्गावरच झोपल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेच्या सुमारास काही प्रवाशांनी व इतर वाहन चालकांनी सदर वाहन चालकांना झोपेतून उठल्यानंतर सदरची वाहने मार्गस्थ झाली.
सुरक्षा यंत्रणांनी अथक परिश्रमानंतर कोणत्याही मोठ्या दुर्घटनेशिवाय सदरची परिस्थिती हाताळली असली तरी या घटनेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांचा मुद्दा देखील चव्हाट्यावर आला आहे. ज्या असंख्य नागरिकांचे या 36 तासाच्या वाहतूक कोंडीमुळे अतोनात हाल व नुकसान झाले त्याची भरपाई शासन कशी देणार अशी विचारणा सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागली आहे.