पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून 8 जुलै 2026 ला झालेल्या दुर्घटनेत 9 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पांतर्गत सदनिकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागास आदेश दिले आहेत.
पाच नोव्हेंबर 2026 च्या प्रस्तावानुसार, एकूण 9 पैकी 8 मृत कर्मचार्यांच्या कायदेशीर वारसांना मोफत सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये राहुल गायकवाड यांच्या पत्नी अश्विनी गायकवाड, महेश कुंभार यांच्या पत्नी शिवुबाई कुंभार, अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा बने, वामन कसबे यांच्या पत्नी सुनीता कसबे, सनी माने यांच्या पत्नी कांचन माने, सुनील कोरके यांच्या पत्नी पल्लवी कोरके, भावेश वाणी यांच्या पत्नी मोहिनी वाणी, तर रणजित पाटील यांच्या आई छाया जयवंत पाटील यांचा समावेश आहे.
दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना सदनिका दिली जाणार आहे. मोशी डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याबाबत महापालिका सभेने 2 सप्टेंबर 2026 रोजीच्या ठरावानुसार मान्यता दिली.
त्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने मोफत सदनिका देण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. त्यानुसार यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात या आठ सदनिका उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश आयुक्तांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुर्घटनेत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या कुटुंबांना निवार्याचा कायमस्वरूपी आधार मिळणार आहे. दरम्यान, मृत झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात आले आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका संवेदनशील आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका