Moshi Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून आरोप-प्रत्यारोप; ‘नैसर्गिक आपत्ती’चा दावा करणाऱ्या अहवालावर प्रश्नचिन्ह

खासगी संस्थेने स्वतःहून दिला स्ट्रक्चरल अहवाल; महापालिका, ठेकेदार व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मोशी कचरा डेपोतील दुर्घटना नैसर्गिक आपत्ती भासविण्याचा प्रयत्न शहरातील एका स्वयंघोषित खासगी संस्थेने केला आहे. त्यातून महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार तसेच, प्रशासनाला वाचविण्याचा खटाटोप सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोशी कचरा डेपोतील महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर अ‍ॅन्टोनी लॉरा एन्व्हायरो आणि ए. जी. एन्व्हायरो या दोन कंपनीमार्फत सुरू आहे. त्या ठेकेदार कंपनीने वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाशेजारी प्रशासकीय इमारत बांधली होती. ती इमारती खचून तसेच, कचर्‍याचे डोंगर त्यावर पडून कंपनीचे १८ कर्मचारी त्यात अडकले होते. बचाव कार्यादरम्यान त्यातील नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढले असून, एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जणांचा शोध घेतला जात आहे.

त्यासंदर्भात शहरातील प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिशन (पीएसईए) या खासगी संस्थेने स्वत:हून दुर्घटना झालेल्या भागाची पाहणी करून प्राथमिक अहवाल दिला आहे. सततच्या पावसामुळे कचऱ्याच्या डोंगराखाली जमिनीत पाणी तयार झाले. त्यामुळे कचराच्या आडवा दाब निर्माण होऊन लगतची इमारत कोसळल्याचा अंदाज त्या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यातून ती दुर्घटना नैसर्गिक असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. ती माहिती खासगी एजन्सीमार्फत प्रसिद्धीसाठी वृत्तपत्राकडे पाठवली आहे.

त्या संस्थेकडून महापालिकेने तसेच, पोलिसांनी पाहणी अहवाल मागवला नव्हता. त्या खासगी संस्थेने स्वत:हून तो अहवाल तयार केला आहे. त्यातून महापालिका प्रशासन, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार व इतरांना वाचविण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. कोणतीही सूचना तसेच, अधिकार नसताना स्वत:हून दुर्घटना स्थळाची पाहणी करून स्ट्रक्चरल अहवाल देण्याची सूचना संस्थेला कोणी केली. त्यांनी हा अहवाल का तयार केला, याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

महापालिकेने कोणालाही पाहणी अहवाल तयार करण्यास सांगितले नाही. प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (पीएसईए) या खासगी संस्थेला मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेतील इमारतीची पाहणी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यांनी कधी पाहणी केली? कोणता अहवाल, कोणाला अहवाल दिला, हे आम्हांला माहीत नाही, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT