Moshi Garbage Depot: बापरे ! कचऱ्याचा डोंगर ३५ वर्षांपासून; कचरा एकाच ठिकाणी साचला

सध्या दररोज तब्बल 1 हजार 400 ते 1 हजार 500 टन (टीपीडी) कचरा जमा होत आहे.
Moshi Garbage Depot
Moshi Garbage DepotPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा संपूर्ण कचरा मोशी कचरा डेपोत जमा होतो. पूर्वी दररोज 700 ते 800 मेट्रिक टन कचरा जमा होत होता. झपाट्याने वाढत असलेले शहर तसेच, वाढत्या लोकसंख्येमुळे कचराचे प्रमाणही वाढले आहे.

सध्या दररोज तब्बल 1 हजार 400 ते 1 हजार 500 टन (टीपीडी) कचरा जमा होत आहे. परिणामी, डेपोतील गेल्या 35 वर्षांपासूनचे कचर्‍याचे डोंगर काही हटत नसून, वाढतच असल्याचे वास्तव आहे. त्यातून डेपोतील वेस्ट टू एनर्जी कार्यालयाची इमारत ढासळून कर्मचार्‍यांचा नाहक बळी जात असल्याच्या घटना असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Moshi Garbage Depot
Moshi Accident: मोशी दुर्घटनेमुळे पोलिसांवर तिहेरी ताण; बचावकार्य, वाहतूक नियंत्रण आणि पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी

महापालिकेच्या 81 एकर जागेत मोशी कचरा डेपो आहे. तेथे गेल्या 35 वर्षांपासून संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकला जात आहे. झपाट्याने वाढत असलेल्या शहरामुळे कचराही वाढत आहे. सध्या दररोज 1 हजार 400 ते 1 हजार 500 टन कचरा जमा होत आहे. तीस लाख लोकसंख्येच्या शहरातील एक व्यक्ती दिवसाला सरासरी 407 ग्रॅम कचरा निर्माण करते.

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने मोशी डेपोत कचर्‍याचे मोठे मोठे उंच डोंगर तयार झाले आहेत. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे मोशी परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहेत. तसेच, कचर्‍यातून लिचड सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे.

कचर्‍याच्या डोंगराची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट टू सीएनजी, प्लास्टिकपासून इंधन व कच्चा माल, ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती तसेच, बांधकाम राडारोड्यापासून वाळू, खड्डी व पेव्हिंग ब्लॉकचे तयार करणे आदी प्रकल्प उभारले आहेत. तसेच, कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग केले जात आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

बायोमायनिंगचे 42 कोटी खर्चाचे काम 2021 पासून सुरू झाले. दुसरा टप्पातील 105 कोटी खर्चाचे काम 2023 पासून सुरू आहे. आत्तापर्यंत एकूण 12 लाख क्युबिक मीटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले असून, केवळ 80 ते 90 हजार क्युबिक मीटर कचरा शिल्लक आहे. तो कचरा हटविण्यास आणखी दोन ते अडीच महिने लागतील. दुसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास वर्ष लागणार असल्याचे चित्र आहे.

Moshi Garbage Depot
Moshi Accident: धीर सोडू नका; प्रशासन तुमच्या पाठीशी; आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी साधला नातेवाईकांशी संवाद

दरम्यान, बायोमायनिंग आणि इतर खर्चिक प्रकल्पांद्वारे कचर्‍याचे डोंगर हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या शहरीकरणासह लोकवस्तीमुळे कचराचे संकलनात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावणे आणि कचरा जमा होण्याचे प्रमाण जुळत नसल्याने मोशी डेपोतील कचर्‍याचे डोंगर हटत नसल्याने वास्तव चित्र आहे.

लोकसंख्या वाढीमुळे कचरा कमी होत नसल्याचा प्रशासनाचा दावा

गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कचरा मोठ्या प्रमाणात भिजल्याने पाच ते सहा महिने काम करता आले नाही. परिणामी, बायोमायनिंगच्या कामास विलंब झाला. पूर्वी 700 मेट्रिक टन कचरा जमा होत होता.

त्यानुसार वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, शहराचा कचरा दुप्पटीपेक्षा अधिकने वाढल्याने मोशी डेपोत कचरा जमा होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून जमा झालेल्या कचर्‍याचे डोंगर हटण्यास विलंब होत आहे, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.

बायोमायनिंगमुळे 25 एकर जागा रिकामी होणार

बायोमायनिंगचे दोन्ही टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर मोशी कचरा डेपोतील 25 एकर जागा रिकामी होणार आहे. त्या जागेत दुसर्‍या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच, हॉटेल वेस्ट टू सीएनजी प्रकल्प उभारला जाणार आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

तीन वर्षांत प्रथमच वीजनिर्मिती बंद

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी डेपोच्या कार्यालय इमारत कोसळून कर्मचारी अडकून पडण्याची दुर्घटना बुधवारी (दि.8) दुपारी घडली. तेव्हापासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील 14 मेगा वॅट वीज निमिर्ती प्रकल्प बंद आहे. एक ऑगस्ट 2023 ला सुरू झालेला हा प्रकल्प प्रथमच बंद झाला आहे.

शहराला दुसर्‍या कचरा डेपोची नितांत गरज

पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढत असल्याने कचर्‍याचे प्रमाणही झपाट्याने वाढ आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरासाठी दुसरा कचरा डेपोची निवड केली होती. पुनावळे येथे अत्याधुनिक कचरा डेपो प्रस्तावित केला होता.

त्यासाठी वन विभागाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, सदनिकाधारकांसह बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केल्याने कचरा डेपोचे आरक्षण हटविण्यात आले आहे. परिणामी, मोशी कचरा डेपोवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

मोशी डेपोत कचरा टाकणे बंद करण्याबाबत नगरसेवकांचा सभागृहात संताप

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा मोशी कचरा डेपोत आणून टाकला जात आहे. त्यामुळे डेपोत कचर्‍याचे डोंगर तयार झाला आहेत. आजूबाजूचे रहिवाशी दुर्गंधीसह इतर त्रासाने त्रस्त आहेत. तसेच, त्या भागांतील जमिनीचे तसेच, घराचे दर शहरातील इतर भागाच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे मोशी डेपोत कचरा आणून टाकणे आता बंद करा, असा संताप मोशी व भोसरी भागातील नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news