

गणेश विनोदे
वडगाव मावळ: गेल्या चार दिवसांत मावळ तालुक्यातील शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत; परंतु याला पाऊस हेच एकमेव कारण नाही, तर बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून स्वतःचा फायदा करून घेतला आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना बसल्याचे दिसते.
ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक स्रोत बदलले
गेल्या काही वर्षांत मावळ तालुक्यात प्रामुख्याने वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, सोमाटणे फाटा, कान्हे, जांभूळ, साते, कामशेत या मुंबई-पुणे महामार्गाच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग तसेच छोटे-मोठे गृहप्रकल्प उदयास आले आहेत.
आंदर मावळच्या भागातही कवडीमोल भावाने डोंगर किंवा डोंगरपायथ्याच्या जागा घेऊन मोठ्या धनिकांनी त्याठिकाणी वाटेल तशा पद्धतीने जागा विकसित करून फार्म हाऊस किंवा प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आणि पैसे कमवले आहेत.
अनधिकृतपणे केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करून पाहिजे तशी जागा विकसित करायची, ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक स्रोत बदलायचा, सुरुंग लावून डोंगर फोडायचे अशा प्रकरणामुळे संबंधित भागातील जागा ढिसूळ झाल्याने दरड कोसळण्यासारखे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडल्याचे पाहायला मिळाले.
पुराचा घरांना फटका
तसेच, शहरी भागात किंवा शहरालगतच्या भागात सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या गृहप्रकल्पाच्या कामामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिल्डर्स गृहप्रकल्पांची मंजुरी मिळवताना जागेत बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या ओढ्या-नाल्यांना बंदिस्त करून छोटे पाईप टाकून देतात. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती होऊन याचा फटका आजूबाजूच्या घरांना, शेतीला बसतो असेही अनेक प्रकार घडले आहेत.
वडगाव शहरात पूरस्थितीला बिल्डरच कारणीभूत ?
वडगाव शहरात प्रामुख्याने सांगवी रस्त्यावर खापरे ओढ्याजवळ, प्रभाग १७ मध्ये मोरया कॉलनी, तसेच दिग्विजय कॉलनी, दत्त मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ आदी ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीला नैसर्गिक ओढे-नाल्यांवर झालेले अतिक्रमण हे मुख्य कारण दिसत आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले असून, काही भागात खासगी प्लॉटिंग झालेले आहे.
संबंधित जागा विकसित करताना नैसर्गिक ओढे, नाले बुजवून टाकून भूमिगत पाईपद्वारे कृत्रिमरीत्या केले जातात. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी बाहेर पडायला जागा आहे तिथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते, हाच प्रकार वडगाव शहरात घडला आहे. वास्तविक बिल्डर्स बांधकाम करताना नगरपंचायतकडून मंजुरी करून घेतात; परंतु त्यापद्धतीने काम होत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. बिल्डरांनी केलेल्या या मनमानी कामावर प्रशासनाचा अंकुश आहे की नाही? हा प्रश्नच आहे.
साते गावातही ओढ्यावरील अतिक्रमणांमुळे शेतीचे नुकसान
साते ग्रामपंचायत हद्दीतील बऱ्याच ठिकाणी मर्जीप्रमाणे पारंपरिक ओढ्यांचा प्रवाह बदलला गेला आहे. ओढ्याच्यालगत गृहप्रकल्प, प्लॉटिंग योजना आखत असताना सीमाभिंत बांधल्या गेल्या. अहिरवडे येथून येणाऱ्या सर्वांत जुना खापरे ओढा त्यावर भराव टाकून अतिक्रमणे झाली. ओढा साफसफाईच्या नावाखाली प्रवाह बदलले गेले. घर दुरुस्ती करताना जो कचरा होतो तोसुद्धा याच ओढ्यात टाकला याचा परिणाम पूरस्थितीत होऊन शेतीवर झाला असल्याचे तुकाराम आगळमे यांनी सांगितले.