Moshi Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Accident Rescue: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा तिसरा दिवस; आठ कर्मचाऱ्यांचा शोध नाही, नातेवाईकांचा संयम सुटला

बचावकार्याच्या गतीवर नाराजी; घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, YCM रुग्णालयातही सुरक्षा व्यवस्था कडक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर तिसरा दिवस उजाडला तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांचा शोध अद्याप लागला नसल्याने त्यांच्या नातेवाईकांचा संयम सुटू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून तहान-भूक विसरून घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या नातेवाईकांकडून बचावकार्याच्या गतीवर आणि महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

बुधवार (दि. ८) घडलेल्या या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशामक दल आणि महापालिकेच्या विविध यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र, काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. आवश्यक यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध करून देण्यात महापालिकेला अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक तासागणिक आशा मावळत असल्याने नातेवाईकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

घटनास्थळी उपस्थित काही नातेवाईक प्रशासनाकडे वारंवार कामाच्या प्रगतीची माहिती मागत आहेत. बचावकार्यात आणखी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तातडीने वाढवावे, अशी मागणी होत आहे. काहींनी प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, नातेवाईकांचा वाढता रोष आणि संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, प्रशासन आणि नातेवाईक यांच्यात समन्वय राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने नातेवाईकांची अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू लागली आहे.

दुर्घटनेत अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासोबतच यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बचावकार्यातून बाहेर काढण्यात येणाऱ्या जखमी अथवा मृत कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम वायसीएम रुग्णालयात आणले जात असल्याने नातेवाईकांची गर्दी होत आहे. भावनिक वातावरण आणि संभाव्य तणाव लक्षात घेऊन रुग्णालय परिसरात अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नातेवाईकांना आवश्यक माहिती देण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT