मोशी: पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विस्तरणारा भाग म्हणून तळवडे, चिखली, जाधववाडी आणि मोशी या परिसराकडे पाहिले जाते. या भागात मोठमोठे गृहप्रकल्प आणि उद्योग, कंपन्यांचे जाळे निर्माण होत असतानाच दुसरीकडे मूलभूत क्रीडा सुविधांबाबतीत मात्र येथील नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. विशेषतः ऐन उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांना पोहण्यासाठी स्वतःचा एकही महापालिकेचा जलतरण तलाव उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या पाहता महापालिकेच्या वतीने अद्याप या भागात जलतरण तलावाचे कोणतेही ठोस नियोजन किंवा आरक्षण कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे.
सध्या या भागातील नागरिकांना पोहण्याचा आनंद घेण्यासाठी किंवा जलतरणपटूंना सराव करण्यासाठी 5 ते 10 किलोमीटर लांब जावे लागत आहे. किंवा अव्वाच्या सव्वा पैसे देऊन खासगी जलतरण तलावात जावे लागत आहे. चिखली आणि तळवडे येथील रहिवाशांना यमुनानगर किंवा निगडी प्राधिकरण परिसरातील तलावांचा आधार घ्यावा लागतो. तर मोशी, जाधववाडी, चऱ्होलीतील नागरिकांना वडमुखवाडी किंवा भोसरीतील तलावांकडे धाव घ्यावी लागते.
वाढते शहरीकरण आणि वाढती रहदारी लक्षात घेता, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पोहायला नेणे पालकांसाठी मोठे कसरतीचे काम ठरत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली असता, अद्याप अशा कोणत्याही तलावासाठी विशेष मागणी किंवा आरक्षण विकसित करण्याचे नियोजन नसल्याचे समजते. मोशी प्राधिकरणाचा भाग मोठा असूनही नागरिकांना भोसरी गाव तलाव परिसरातील तलावांवर अवलंबून राहावे लागते. शहरातील इतर विकसित भागांच्या तुलनेत या उपनगरांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
क्रीडा विभागाचे दुर्लक्ष
तळवडे आणि चिखलीसाठी स्वतंत्र आणि मोशी, जाधववाडी परिसरासाठी स्वतंत्र अशा दोन ठिकाणी सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज जलतरण तलावांची उभारणी करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, आगामी विकास आराखड्यात या सुविधांसाठी जागा आरक्षित करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात नागरिकांना स्थानिक स्तरावरच खेळाच्या आणि व्यायामाच्या सुविधा उपलब्ध होतील.
आम्हीही कर देतो; मग सुविधा का नाही?
तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी परिसराचा महापालिकेत समावेश होऊन 25 वर्षे होऊन गेली. तेव्हापासून आम्ही महापालिकेकडे विविध कर भरत आहे. महापालिका प्रशासन सर्व भागांत सोयीसुविधा करत आहे. रस्ते, विविध विकासकामे करत आहेत. तसेच उद्याने, क्रीडांगणे, जलतरणतलाव आदी करत आहे तर मग आम्हालाच का वंचित ठेवले जात आहे. आम्ही देखील महापालिकेला कर देतोच की, असा सवाल नागरिक प्रशासनाला करत आहेत.
आमचा परिसर वेगाने वाढत आहे पण सुविधांच्या नावाने आनंदीआनंद आहे. मुलांना पोहायला शिकवण्यासाठी यमुनानगरला जावे लागते. या भागात एक तरी सुसज्ज जलतरण तलाव हवा, ही आमची मागणी आहे.प्रतिभा देशमुख, तळवडे
मोशी प्राधिकरणाची लोकसंख्या आता खूप वाढली आहे. उन्हाळ्यात स्थानिक मुलांना विरंगुळ्यासाठी कुठेच जागा नाही. महापालिकेने खेळाच्या आरक्षणाबाबत केवळ कागदावर नियोजन न ठेवता, प्रत्यक्षात या भागात तलावाचे काम सुरू करावे.संतोष बोराटे, मोशी
वाढती लोकसंख्या बघता तळवडे, चिखली परिसरासाठी एक जलतरण तलाव आणि मोशी परिसरासाठी स्वतंत्र जलतरण तलावाची आवश्यकता आहे. मात्र, सध्या यासाठी कोणतेही आरक्षण प्रस्तावित नाही.रंगराव कारंडे, क्रीडा अधिकारी, मनपा