Moshi RTO Parking Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi RTO Parking Issue: मोशी आरटीओ परिसरात बेशिस्त पार्किंगचा विळखा; नागरिक त्रस्त

आरटीओ कार्यालयाबाहेर वाहनांची बेकायदेशीर पार्किंग वाढल्याने वाहतूक कोंडी; रहिवाशांकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मोशी: मोशी प्राधिकरणातील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाबाहेर दररोज येणाऱ्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे परिसराला अनधिकृत पार्किंगचा विळखा पडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

आरटीओ कार्यालयात विविध कामांनिमित्त येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावर आणि आजूबाजूला कशीही उभी करून निघून जातात. या कार्यालयाच्या बाजूलाच मोठ्या रहिवासी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोर आणि संरक्षक भिंतींना लागूनच दिवसभर गाड्या उभ्या केल्या जात असल्याने, येथील रहिवाशांना आपल्या स्वतःच्या सोसायटीत ये-जा करतानाही विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी आणि सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ प्रशासन तसेच संबंधित विभागांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आरटीओ कार्यालयासाठी स्वतंत्र व हक्काची जागा आरक्षित करण्यात आल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून फक्त कागदावर आणि बैठकांमध्येच सुरू आहेत. मात्र, या चर्चांना प्रत्यक्ष कृतीची जोड मिळून कामाला गती येणे आता अत्यंत आवश्यक आहे.

शासकीय व अशासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक अनेकदा आपल्या वाहनांचे अत्यंत बेशिस्तपणे पार्किंग करतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या कार्यालयाच्या अगदी बाजूलाच रहिवासी परिसर असल्यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, चिखली येथे स्थलांतर झाल्यानंतर कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या रिकाम्या जागेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सुयोग्य आखणी केली जाईल. नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर लावण्याऐवजी या निश्चित केलेल्या जागेत पार्क करण्याचे आवाहन केले जाईल, ज्यामुळे या भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणि परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता, येत्या १ जुलैपासून मोठ्या वाहनांचे (कमर्शियल गाड्या) फिटनेस तपासणीचे काम चिखली येथील नवनिर्मित वाहन तपासणी केंद्रात टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्यात येणार आहे. सध्या तेथील पोहोच रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात काही गाड्यांची तपासणी तेथे केली जाईल. पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण क्षमतेने चिखलीत सुरू होईल, ज्यामुळे आरटीओ परिसरातील मोठ्या गाड्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी.
बेशिस्त पार्किंगचा थेट फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी या समस्येचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. केवळ वाहनतळाच्या जागेबाबत चर्चा करत न राहता, त्या चर्चेच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष गती देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.
तुषार सहाने, नगरसेवक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT