Power Cut Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Power Cut Issue: मोशी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

भोसरी ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे वारंवार खंडित वीजपुरवठा; परीक्षा काळात विद्यार्थ्यांना फटका

पुढारी वृत्तसेवा

मोशी: पिंपरी-चिंचवडमधील मोशी प्राधिकरणात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. येथील पेठ क्रमांक 4, 6 आणि 9 मधील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः सध्या 10 वी, 12 च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, ऐन परीक्षेच्या काळात वीज गायब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. भोसरी येथील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे.

सध्या आयटी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांचे कर्मचारी मवर्क फॉम होमफ करत आहेत. त्यांना सततच्या विजेच्या लपंडावामुळे काम करण्यात अडथळा येत आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. पूर्वसूचना न देता महावितरणकडून वीज खंडित केली जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. यामुळे सोसायट्यांमधील लिफ्ट, पाण्याचे पंप आणि इतर स्वयंचलित उपकरणे बंद पडत आहेत. संतोषनगरमधील श्री गजानन, एल ॲक्सिस, मर्मबंध, मम मोरिया यांसारख्या अनेक सोसायट्यांमध्ये ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा बिघाड झाला असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी 26 पर्यंत दिवसातील दीड ते दोन तास भारनियमन राहण्याची शक्यता असून, त्यानंतरच येथील वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

गेले सात ते आठ वर्षांपासून खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिक क्षेत्राच्या तुलनेत रहिवासी परिसरात ही समस्या अधिक आहे. आज वर्क फॉम होम करणारे कर्मचारी, विद्यार्थी, गृहिणी आणि मोठ्या प्रमाणात असणारे सेवानिवृत्त नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निखिल काळकुटे, नागरिक
ही आजची समस्या नाही आहे. गेले अनेक दिवसांपासून प्राधिकरण क्षेत्रात खंडित वीजपुरवठ्यामुळे मोशीकर हैराण आहेत. कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे सीपी ग््रााम या ॲपवर तक्रार केली असून राज्य पातळीवर हा विषय यामुळे पोचला असून, आता तरी याची गांभीर्याने दखल घेतली जाईल अशी आशा आहे.
संतोष वारे, स्थानिक नागरिक
भोसरीतील मुख्य दोन रोहित्रात मोठा बिघाड झाला होता. मात्र, दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे. परंतु, रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहेत. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, भोसरी विद्युत विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT