पिंपरी: मोशी कचरा डेपो पुन्हा सुरू न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचे कचरा संकलन व्यवस्थापन बिघडले आहे. शहरात जागोजागी कचर्याचे ढीग निर्माण झाले आहेत. कचरा संकलन व कचरा स्थानांतरण केंद्राच्या परिसरात कचर्याने भरलेली वाहने दृष्टीस पडत आहेत.
त्यात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडी येथे कचरा टाकण्यास मनाई केल्याने कचरा समस्या अधिक गंभीर झाली आहे. महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचार्यांचा दुर्देवी अंत झाला होता.
तर, अनेक कर्मचारी जखमी झाले होते. ती घटना 8 जुलैला घडली. त्या दिवसापासून मोशी डेपोत कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यास 15 दिवस होऊनही अद्याप मोशी कचरा डेपो सुरू न झाल्याने शहरात सर्वत्र कचर्याचे ढीग निर्माण झाले आहेत.
नदीकाठी, उड्डाणपुलाखाली, मोकळ्या जागा, कचरा संकलन केंद्र, कचरा स्थानांतरण केंद्र व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
खडकी कचरा डेपोतही टाकता येईना कचरा
महापालिका प्रशासनाने विनंती केल्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडी येथील कचरा डेपोत तसेच, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कासारवाडीतील शंकरवाडी येथे कचरा जमा करण्यात येत होता.
मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने केवळ पाच दिवसांसाठी कचरा जमा करण्यास परवानगी दिली होती. ती संपल्याने तेथे कचरा टाकण्यास बोर्डाने मनाई केली आहे. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. तर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने कचरा वाहने ये-जा करता येत नसल्याने तेथे कचरा टाकणे बंद केले आहे.
धोकादायक कचर्याचे डोंगर हटवण्याचे काम सुरू
मोशी कचरा डेपोतील तो रस्ता मोकळा झाला आहे. धोकादायक कचर्याचे ढीग कमी करण्याचे काम सुरू आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ते काम खबरदारी घेऊन केले जात आहे. कचराचा डोंगर मोठा असून, पावसाची संततधार कायम असल्याने कामात अडथळे येत आहेत, असे पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
कचरा संकलनाची समस्या
मोशी कचरा डेपो कधी सुरू होणार या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत नाही. काम सुरू आहे. कचर्याचे धोकादायक ढीग हटवले जात आहेत. त्यामुळे सध्या डेपोत कचर्याची वाहने सोडली जात नाहीत. परिणामी, कचर्याचे संकलन कोठे करायचे?, हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
स्थायी समिती अध्यक्षांकडून कचरा संकलन केंद्राची पाहणी
स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी काळेवाडीतील एम. एम. शाळेजवळील कचरा संकलन केंद्राला भेट दिली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापनाचे अधिक सक्षम नियोजन करावे. दुर्गंधी येणा नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
कचर्यावरून नगरसेवकांच्या तक्रारी
मोकळी जागा, रस्त्यांवर कचरा साचला आहे. कचरा संकलन केंद्र, कचरा स्थानांतरण केंद्र आदी ठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी येत आहे, अशा तक्रारी नागरिकांसह नगरसेवकांकडून केल्या जात आहेत. सर्वत्र कचर्याचे ढीग निर्माण झाल्याने तक्रारींची संख्या वाढली आहे.