मोशी: चिखली येथील पाटीलनगरकडे जाणार्या उतारावरील रस्त्यात महावितरणकडून रोहित्र बसविण्यात आले होते. परंतु, पाटीलनगर परिसरात रहिवासी भाग वाढल्याने नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढल्याने रोहित्र वाहतुकीस अडथळा ठरत होते. यामुळे पाटीलनगर व देहू-आळंदी मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली होती.
येथील रोहित्र हटविण्यासाठी अनेक वर्षांपासून चिखलीकर महावितरण व महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेर पाटीलनगर येथील रोहित्र हटविल्याने येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. (Latest Pimpri News)
चिखली- पाटीलनगर येथे देहू- आळंदी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरणचे रोहित्र हटविण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी आंदोलन, पाठपुरावा केला होता. माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, युवा नेते विनायक मोरे यांनीही आमदार महेश लांडगे यांच्याकडे तसेच महापालिका प्रशासन, महावितरण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाटीलनगरच्या रोहित्रामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. हा रस्ता विना अडथळा वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडे तसेच महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर रोहित्राचे स्थलांतर करण्यात आले.- विनायक मोरे, सामाजिक कार्यकर्ते.
रोहित्राचे स्थलांतर करण्यासाठी योग्य जागा शोधने आवश्यक होते. त्यानुसार परिसरात जागा निश्चित केली. आमदार महेश लांडगे यांनी महावितरण, महापालिका अधिकार्यांना सोबत घेऊन चर्चा केली. नागरिकांना होणारा त्रास, वाढणारी कोंडी दूर करण्यासाठी अखेर रोहित्राचे स्थलांतर केले.- कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक