

Induri Garbage Near Talegaon Chakan Issue
इंदुरी : तळेगाव - चाकण महामार्गावर इंदुरी येथील नवीन पुलाच्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पाऊस पडल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे प्लास्टिकचा कचरा खाल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
महामार्गालगतची छोटे - मोठे ढाबे, टपऱ्यामधील टाकावू खाद्य पदार्थ प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून टाकण्यात येत आहे. परिसरात चरायला आलेली मोकाट जनावरे व मोकाट कुत्रे टाकाऊ अन्नाच्या वासाने कचरा खाण्यासाठी तुटून पडतात. या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून भटके कुत्रे गाडीसमोर आल्याने अपघात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच पुलाच्या पुढे नागरिकांच्या रोपवाटिका आहेत, कचऱ्याची दुर्गंधीमुळे त्यावर बसलेल्या माशा आणि डासांमुळे रोगराई व साथीचे आजार पसरण्याची चिन्हे असल्याने संबंधित विभागाने कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहन चालकांनी केली आहे.
काय करता येईल :
* प्लास्टिक विरोधात जनजागृती करणे जरुरीचे.
* प्लास्टिक वापरावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
* जनावरांना सकस आहार, क्षार मिश्रणे व जंतनाशक नियमित द्यावीत.
* जनावरांना चरायला मोकाट सोडू नये.
* शिल्लक अन्नाची योग्य ती विल्हेवाट लावावी.
* पर्यावरणाचा र्हास होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे
जनावरांनी प्लास्टिक खाल्ल्याने ते जनावरांच्या पोटात साचल्याने पचनक्रिया बिघडून गॅस तयार होतो. तसेच जनावरांच्या फुफुस व हृदयावर ताण पडतो . दुभत्या जनावरांने खाल्याने त्यांची तब्येत खालावते व दूध देण्याची क्षमता कमी होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
–डॉ. उदय भोसले, पशुधन विकास अधिकार, तळेगाव दाभाडे.