Moshi Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Accident: मोशी दुर्घटनेत नागेश गायकवाड बेपत्ता; दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंबाची नजर ढिगाऱ्याकडे

तीन वर्षांपासून कंत्राटी कामावर असलेला २५ वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता; भावाची सुटका होण्याच्या आशेने कुटुंब व्याकुळ

पुढारी वृत्तसेवा

मोशी: मोशी येथील दुर्घटनेने अनेक कुटुंबांची स्वप्ने एका झटक्यात धुळीला मिळवली आहेत. येथील संजय गांधी नगर परिसरात राहणाऱ्या अशाच एका सुखी कुटुंबातील २५ वर्षांचा तरुण नागेश गायकवाड हा कालपासून बेपत्ता असल्याने संपूर्ण गायकवाड कुटुंब चिंतेच्या गर्तेत बुडाले आहे. मोशी येथील लक्ष्मी चौकात मधील ते रहिवासी आहेत.

नागेश गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. अवघ्या १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अत्यंत जिद्दीने या कामात रुजू झाले. नागेश यांचा चुलत भाऊ अक्षय गायकवाड देखील तिथेच सुपरवायझर म्हणून काम पाहत असून, त्यांनीच नागेश यांना येथे कामाला लावले.

स्वतःचे हक्काचे घर बांधून आई-वडील, भाऊ आणि नागेशचे कुटुंब अत्यंत सुखाने एकत्र राहतात. नागेशचे वडील टाटा मोटर्समध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात, तर मोठा भाऊ स्वप्निल गायकवाड हे टाटा मोटर्समध्येच काम करून कुटुंबाला हातभार लावतात. नागेशची पत्नी सोनाली ही गृहिणी आहे. नागेश यांना चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया अशा दोन मुली आहेत. श्रेया एक्सलंट स्कूल येथे शिक्षण घेत आहे.

काल दुर्घटना घडल्याचे समजल्यापासून "माझा लहान भाऊ सुखरूप असेल, तो नक्की परत येईल," या आशेने स्वप्निलची नजर ढिगाऱ्याकडे लागली आहे. कालपासून भावाचा कोणताही सुगावा न लागल्याने स्वप्निल पूर्णपणे अस्वस्थ झाले असून, त्यांचा धीर आता सुटू लागला आहे.

घरात वृद्ध आई-वडील, मित्र आणि नागेशच्या दोन चिमुरड्या लेकी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत. एका कष्टाळू आणि हसत्याखेळत्या तरुणावर निसर्गाने आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाने आणलेली ही वेळ पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्वप्निल आपल्या भावाच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे साकडे घालत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT