

पिंपरी: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवार (दि. ८) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार या पार्श्वभूमीवर शहरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. देहूकरांचा पाहुणचार घेऊन सोहळा पिंपरी-चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी शहरात ५ वाजून १५ मिनिटांनी दाखल झाली. टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत, विणेच्या अखंड झंकारात, 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
या पालखी सोहळ्याला आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. प्रत्येक दिंडीप्रमुखाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. निगडीत दाखल झाल्यानंतर पालखीच्या रथाचे सारथ्य महापौर रवी लांडगे यांनी केले.
पालखी शहरात दाखल होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी शहरवासीयांनी पारंपरिक वेष परिधान करून या सोहळ्यात सामील होत सोहळ्याचा आनंद घेतला. हा सोहळा पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली. काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत पालखीचे लांबून का होईना दर्शन घेण्यासाठी दुपारपासूनच गर्दी केली होती. या वेळी भक्ती-शक्ती चौकात वैष्णवांचा भक्तीचा मळा फुललेला पहावयास मिळाला. कानाकोपर्यातून देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर आलेल्या वारकर्यांचा भक्तीमय पालखी सोहळा उद्योगनगरीत दाखल दाखल झाला. या भक्ती सोहळ्याची अनुभूती पाहण्यासाठी शहरवासीयांनीदेखील अलोट गर्दी केली होती.
महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ- मृदुंगाच्या ठेक्यावर, 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात तल्लीन होतात.
महापालिकेकडून स्वागत
कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम घेत वारकरी पिंपरी-चिंचवड शहरात येत होते. त्यांच्या स्वागतासाठी निगडीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात महापालिकेने स्वागत कक्ष उभारला होता. दुपारपासून भक्तिगीते आणि अभंग यांनी वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी स्वागतासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नागरिकांनी चौकात भक्तिगीते आणि अभंग यावर फुगड्या आणि फेर धरून वातावरणात चैतन्य निर्माण केले. पालखी सोहळा स्वागतासाठी भक्ती-शक्ती चौकात मंडप टाकण्यात आले होते. पालखीच्या पुढे-मागे मानाच्या दिंड्या आणि टाळ मृदंगाच्या गजरातील वारकर्यांची गर्दी झाली होती. भक्ती-शक्ती चौकाच्या चारही बाजूला गाड्यांची रांग लागली होती. त्यातून वाट काढत अबालवृद्धांसह, तरुणाई, परिवार, मित्रमैत्रिणी यांनी भक्ती-शक्ती चौकात गर्दी केली. कपाळावर नाम ओढून सेल्फी काढण्यात भाविक दंग होते.
वारकऱ्यांनी रस्ते फुललेे
दुपारपासूनच शहरामध्ये एकापाठोपाठ दिंड्यांचे आगमन होताच टाळ-मृदुंगाचा नाद ऐकू यायला लागले. पांढर्या वस्त्रातील वारकरी व त्यांच्या हातातील भगवा पताका यांनी रस्ते फुलून गेले. वारकर्यांच्या स्वागतासाठी पावसानेदेखील हजेरी लावली होती.
शहरवासीयांकडून वारकऱ्यांची सेवा
वारकरी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी विसावले. कोणी पालिका शाळेत, कोणी आकुर्डी मंदिराच्या मंडपात तर बाकीचे वारकर्यांची सोय नागरिकांनी आपल्या घरी केली होती. थकलेल्या वारकर्यांची सेवा करताना शहरवासीयांचा उत्साह दिसून येत होता. वारकर्यांसाठी चहा, नाश्ता काही ठिकाणी अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. सर्व सोयीसुविधांचा वारकरी मनापासून लाभ घेत होते. सार्वजनिक मंडळे वारकर्यांची काळजी घेताना दिसत होते.