पिंपरी : मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी-फिनोलेक्स चौक) वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. आता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्या चौकातील आयलॅण्ड व दुभाजकाची रुंदी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होईल, असा आरोप केला जात आहे. तर, त्यामुळे वाहतूक रहदारी सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
मोरवाडी चौकात महापालिकेने लाल घोड्याची प्रतिकृती उभारली आहे. तसेच, सुशोभिकरणासाठी आयलॅण्ड उभारले आहेत. त्या चौकात पिंपरी मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक वर्दळ वाढली आहे. सिग्नल यंत्रणा अयोग्य असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यात रिक्षा व कॅब चालकांकडून बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. तसेच, मेट्रोचे प्रवासी पदपथावर कश्याही प्रकारे वाहने लावून गायब होतात. तसेच, एका कपड्यांच्या दुकानांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.
त्याची दखल घेऊन महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने चौकातील दुभाजक व आयलॅण्डची रुंदी वाढविली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडेल, अशी तक्रर भाजपाचे अनिकेत शेलार यांनी केली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले की, मोरवाडी चौकातील दुभाजक व आयलॅण्डची रुंदी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे ये-जा करणारी वाहने त्याच मार्गातून वळण घेतील. त्यांना इतर मार्गात घुसखोरी करता येणार नाही. तसेच, आवश्यक उपाययोजना व सुशोभिकरण करण्यात येत आहे. सध्या पिंपरी चौकाहून चिंचवडच्या दिशेने जाणारा बीआरटीएस मार्ग तात्पुरता बंद आहे. त्या मार्गावरील बीआरटीचा सिग्नल तात्पुरता बंद केला जाणार आहे.