AI Obscene Photos: एआयद्वारे अश्लील फोटो बनवणाऱ्या तरुणाला बेड्या
पिंपरी: एआयचा वापर करून तयार केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सहकारी तरुणीची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने हा बनाव केल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली.
सुदर्शन सुनील जाधव (25, मूळ रा. वाशीम) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडितेने चिखली पोलिसात तक्रार दिली होती. (Latest Pimpri chinchwad News)
घटना कशी घडली ?
आरोपी जाधव हा एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्यासोबत काम करणाऱ्या 20 वर्षीय पीडितेस प्रेमसंबंधाची मागणी केली होती. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिचे चोरून फोटो काढले. सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून अश्लील मेसेज पाठवले. नंतर एआयच्या मदतीने तरुणीचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
दुहेरी खेळी
पीडितेने आरोपीला विश्वासाने ही माहिती दिली. त्यानंतर आरोपीने तिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणीसोबत चिखली ठाण्यात गेला. तिला तक्रार नोंदवण्यास मदत केली; मात्र सायबर पोलिस तपासात त्याचे बिंग फुटून तोच आरोपी असल्याचे उघड झाले.
पोलिसांचा तपास
पोलिस सोशल मीडिया कंपन्या, मोबाईल ऑपरेटर्समार्फत आरोपीपर्यंत पोहोचले. आयपी ॲड्रेस, मोबाईल क्रमांक तपासून आरोपीचा भांडाफोड केला. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.
कारवाई करणारे पथक
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, प्रवीण शेलकंदे, वैशाली बर्गे, स्वप्नील खणसे यांनी ही कामगिरी केली.
