

चऱ्होली: चऱ्होली फाटा ते विमानतळ मार्गाचे काम साधारण आठ महिने झाले सुरू आहे. भर उन्हाळ्यात सुरू झालेले काम अद्याप पूर्ण झाले नाही. चऱ्होलीमध्ये मागील चार महिन्यांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. भर पावसाळ्यात तयार केलेला हा रस्ता विविध कामांसाठी सातत्याने खोदला जात आहे. यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
चऱ्होलीचा मुख्य रस्ता म्हणजे चऱ्होली परिसरासाठी जीवनदायीनी आहे. चऱ्होलीच्या आजूबाजूला जो सर्व औद्योगिक परिसर आहे त्या औद्योगिक परिसरातून येणारी सर्व अवजड वाहने याच रस्त्याने येजा करतात. (Latest Pimpri chinchwad News)
पुणे-नाशिक रोडवरून येणारी औद्योगिक वाहतूक अलंकापुरम मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौकातून याच रस्त्यावर येते. फुलगाव, मरकळ, धानोरे औद्योगिक क्षेत्रातून येणारी वाहने देखील चऱ्होलीच्या पुलावरून दाभाडे चौक मार्गे याच रस्त्याने प्रवास करतात.
यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे संपूर्ण एअरपोर्ट रोडवर खड्ड्यांचे सामाज्य पसरले आहे. अशातच आता महापालिकेने खोदकाम करून ठेवल्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा खोदला आहे. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
विद्यार्थी, भाजीविक्रेते इतर सर्व प्रकारचे व्यावसायिक आणि नोकरदार यांना रोज याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. पण महापालिकेने ऐन पावसाळ्यात या मुख्य रस्त्यावरच खोदकाम करून ठेवल्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे.
एवढी घाई कशासाठी?
यंदा मान्सून लवकरच देशाबाहेर जाणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. 15 सप्टेंबरपासूनच परतीच्या मान्सूनला सुरुवातदेखील झाली आहे. म्हणजेच थोड्या दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. मग, अजून थोड्या दिवसांनी पाऊस उघडल्यावर जर महापालिकेने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असती तर चालले नसते का? ऐन पावसाळ्यात एवढी घाई कशासाठी, असा प्रश्न चऱ्होलीकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
महापालिकेने जनतेचा विचार करून पावसाळा थांबेपर्यंत तरी रस्त्याचे काम काढण्याची गरज नव्हती. आधीच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत आणि त्यात अजून महापालिकेने रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. चऱ्होलीतील सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
- सचिन तापकीर, कोषाध्यक्ष, भाजपा.
पोपटराव काळजे पेट्रोलियम समोरच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे व्यावसायिक नुकसानदेखील होत आहे. महापालिकेने लवकरात लवकर काम पूर्ण करावे, ही विनंती.
- तेजस काळजे, उद्योगपती, चऱ्होली.
दर काही दिवसांनी पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे काम करण्यास उशीर होत आहे. तरीही लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.
- शिवराज वाडेकर, कार्यकारी अभियंता
रस्त्यावर मोठ्या प्र`माणावर खड्डे पडल्यामुळेच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.
- ए. डी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता, महापालिका.