पीमपी अपघात File Photo
पिंपरी चिंचवड

PMP News: बेदरकार पीमपी! दोन महिन्यांत जवळपास 100 हून अधिक अपघातांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसाकाठी 60 हून अधिक अपघात होत असल्याची नोंद आहे

पुढारी वृत्तसेवा

पंकज खोले

पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक सेवा पुरवणार्‍या पीएमपी बसगाड्यांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये केवळ पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसाकाठी 60 हून अधिक अपघात होत असल्याची नोंद आहे. या अपघातात ठेकेदारांकडील गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पिंपरी व निगडी या दोन आगारांत अपघाताची नोंद ठळकपणे दिसून येते. अपघातांवर नियंत्रणासाठी चालकांवर दंड, पगार कपात, निलंबन, नोटीस अशा कारवाई करूनही चालकांचे वर्तन सुधारत नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए हद्दीमध्ये बससेवा पुरवते. सध्या 2 हजारांहून अधिक बसगाड्या विविध मार्गांवर धावतात. तर, 500 च्या आसपास ई- बसेस सार्वजनिक सेवा पुरवतात. चालकांकडून होणार्‍या चुका अथवा विरुद्ध दिशेने येणार्‍या इतर वाहनांमुळे किरकोळ व बर्‍याच वेळा मोठे अपघाताच्या घटना घडतात. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्याच्या कडेला असलेले पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणामुळे अपघात होत असल्याचे वाहनचालक सांगतात: मात्र अनेकदा बसवरील नियंत्रण सुटणे, दुभाजक दृष्टीस न पडणे व गर्दीत चालवण्याच्या अनुभव नसणे, बेदरकारपणे वाहन चालविणे; तसेच ओव्हरटेकच्या नादात बसचे अपघात घडतात.

शहर परिसरात गेल्या दोन महिन्यांत जवळपास 100 हून अधिक अपघातांची नोंद आहे. मे महिन्यामध्ये 49 विविध ठिकाणी अपघात झाले आहेत. अपघातात केवळ व्यक्ती नव्हे, तर रस्त्यावरील श्वान, भटकी गुरेदेखील जखमी झालेली आहेत. वर्षभरात वेगवेगळ्या मार्गावर 30 नागरिक पीएमपीच्या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. तर, खासगी ठेका दिलेल्या पीएमपी बसचे अपघात सर्वाधिक असून 48 नागरिक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. यात गंभीर, किरकोळ जखमी अपघातदेखील घडले असून त्याची संख्या 53 आहे.

दुचाकी, मोटार घासणे, दुभाजकावर बस धडकणे, सिग्नलच्या दरम्यान अचानक पुढील वाहन थांबणे अशी काही अपघातांची कारणे असल्याचे दिसून आले. अपघात झाल्यानंतर त्याची माहिती पीएमपीएमएलच्या अपघात कक्षाला दिली जाते. जेणेकरून तेथून मदत मिळू शकेल. तसेच, पोलिसांनादेखील पाचारण केले जाते. अपघातामध्ये बसचालकाची चूक असल्यास त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवली जाते. त्यानुसार, त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.

पिंपरी-चिंचवड सध्या सुरू असलेला बीआरटी मार्गातही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी आळंदी येथील बीआरटी मार्गामध्ये काळे कॉलनीमध्ये अपघातात एकाच मृत्यू झाला. फुगेवाडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटी मार्गातही अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वार बीआरटी मार्गातून जात असल्याने किरकोळ अपघातही घडले आहेत.

ठेकेदारांकडील बसगाड्यांचे अपघात सर्वाधिक

पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, भाडे तत्त्वावरील बसेसचे अपघात जास्त प्रमाणात आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बसगाड्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षभरात 12 नागरिकांना गंभीर जखमी केली आहे. तर, 17 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, पीएमपीच्या बसचालकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे गरजेचे असून, गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षित चालकास नेमावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT