रविवारी 233 मिमी पावसाची नोंद
मान्सून आगमनाची जोरदार हजेरी
लोणावळा : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातच मे महिन्यात काही दिवस अगोदरच दाखल झालेला मान्सून यामुळे नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवारी 25 मे रोजी लोणावळ्यातील आजपर्यंत रेकॉर्डब—ेक पाऊस झाला. रविवारी 24 तासांत लोणावळा शहरात 233 मिमी (9.17 इंच) एवढा पाऊस झाला आहे. या पावसामुळे लोणावळा परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.
खरंतर 233 मिमी पाऊस लोणावळाकरांसाठी नवीन नाही. दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात एवढा किंवा त्यापेक्षा अधिकचा पाऊस लोणावळ्यात होत असतो. मात्र, अद्याप पावसाळा सुरू झालेला नसताना व सर्वत्र पूर्व मौसमी पाऊस होत असताना अचानक वातावरणात बदल होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोठी तारांबळ उडाली. प्रशासनाकडून नदी, नालेसफाईची कामे यावेळी लवकर सुरू करण्यात आल्याने फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अचानक ढग फुटी प्रमाणे पाऊस पडल्याने अनेक भागांत पाणी साचण्याचे प्रकार निश्चितपणे घडले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देत पावसाळ्यात या भागांमध्ये पाणी साचाण्याच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, जोरात पाऊस सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे लोणावळा परिसरातील डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटक लोणावळ्यात आल्यानंतर त्यांनी या डोंगर भागात जाण्याचा प्रयत्न करू नये व काळजी घ्यावी.