Pune Crime : तिहेरी खूनप्रकरणात पोलिस उपनिरीक्षकास जन्मठेप; 3 लाखांचा दंड

शस्त्रागारातून शासकीय पिस्तुलाचा अपहार करत तिघांचा खून, आरोपीने गोळ्या घातल्याचे तपासात निष्पन्न
pune crime police sub Inspector triple murder case
Published on
Updated on

पुणे : शस्त्र व दारूगोळा यांच्या सुरक्षेसाठी असताना शस्त्रागारातून पिस्तुल व मॅगझीन लंपास करत त्याआधारे तिघांचा खून करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने जन्मठेपेसह 3 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय बळीराम शिंदे (रा. गोपाळवाडी रोड, सरपंचवस्ती, ता. दौंड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोघांना तर किरकोळ भांडणाच्या कारणावरून एकास असे एकूण तिघांस आरोपीने गोळ्या घातल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

16 जानेवारी 2018 रोजी दौंड परिसरातील नगरमोरी चौक व जिजामाता नगर परिसरात ही घटना घडली. गोपाळ काळुराम शिंदे (वय 34, रा. भवानीनगर, ता. दौंड), परशुराम गुरूनाथ पवार (वय 28, रा. वडारगल्ली, दौंड) अनिल विलास जाधव (वय 34, रा. जिजामाता नगर, लिंगाळी, ता. दौंड) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी, गजानन काळुराम शिंदे (वय 32, रा. देवकीनगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. गोपाळ हे गजानन यांचे भाऊ असून परशुराम हे मेहुणे आहेत. घटनेच्या दिवशी उसनवारी घेतलेले पैसे परत करण्यावरून गोपाळ शिंदे व संजय शिंदे यांमध्ये वाद सुरू होते. याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मेहुण्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, गजानन यांनी मध्यस्थीकरीत मी पैसे देतो असे सांगून गोपाळ व परशुराम यांना घरी जाण्यास सांगितले. यादरम्यान, रस्ता ओलांडून जात असताना गोळीचा आवाज झाला. यावेळी, गजानन यांनी मागे पाहिले असता संजय याने गोपाळवर गोळी झाडली.

त्यानंतर, त्याठिकाणी असलेल्या परशुराम यांवरही गोळी झाडून संजयने रिव्हॉल्वहर गाडीच्या डिक्कीत टाकून दौंडच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर गोपाळ व परशुराम यांना दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर, संजय याने फिर्यादी यांच्या ओळखीच्या असलेल्या अनिल जाधव याच्या घरी जात घराबाहेर त्याच्यावरही गोळी झाडत त्याचा खून केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले. याप्रकरणात आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत त्याविरोधात खटला सुरू झाला. याप्रकरणात, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी 32 साक्षीदार तपासले. यामध्ये, चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॅलेस्टीक एक्सपर्ट आणि डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली.

बॅलेस्टीक एक्सपर्टची अमेरिकेतून रात्री 2 वाजता नोंदविली साक्ष

संजय शिंदे हा नगरच्या दिशेने जात असताना त्याला अटक करण्यात आली. अंगझडतीदरम्यान, त्याच्याकडे पिस्तुल, 22 पैकी 12 जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन आढळून आले. दोन्ही घटनास्थळी ज्या दहा पुंगळ्या मिळाल्या त्या तपासणीसाठी बॅलेस्टीक एक्सपर्टकडे पाठविण्यात आल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या बारा काडतुसांपैकी एकाची तपासणी केली असता त्या घटनास्थळी सापडलेल्या पुंगळ्या संबंधित असल्याचे दिसून आले. याखेरीज, मयताच्या शरीरात ज्या गोळ्या सापडल्या त्या गोळ्या या पिस्तुलातून मारल्या असल्याचा अहवाल बॅलेस्टीक अहवालात होता. याप्रकरणात, सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या बॅलेस्टीक एक्सपर्टची साक्ष अमेरिकेतून व्हीसीद्वारे नोंदविण्यात आली. सकाळी साडे दहा वाजता भारतात न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर एक्सपर्ट साक्षीसाठी अमेरिकेतील वेळेनुसार रात्री दोन वाजता न्यायालयात हजर होत होत्या.

आरोपीच्या कृत्याने चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

मयत व्यक्तींपैकी गोपाळ यास 9 व 7 वर्षांची दोन मुले आहेत. परशुराम यास 7, 5 आणि 2 वर्षांच्या तीन मुली आहेत. तर अनिल यास एक 6 वर्षांची मुलगी आहे. आरोपीच्या कृत्यामुळे या चिमुकल्यांच्या डोक्यावरून पितृछत्र हरविले आहे. संजय हा एसआरपीएफ सेवेत होता. त्यामुळे, नागरीकांचे संरक्ष करणे हे त्याचे कर्तव्य होते. मात्र, त्याने किरकोळ कारणावरून तिघांचा निर्घुण खून केला आहे. कारागृहात असतानाही त्याची वर्तवणूक चांगली नव्हती. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा. समाजावर कायद्याचा वचक रहावा तसेच समाजात योग्य संदेश जाण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली.

दंडाची रक्कम मृतांच्या नातेवाईंकासह शासकीय फंडात

न्यायालयाने आरोपीला तीन लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. दंडाच्या रकमेपैकी ऐंशी टक्के रक्कम घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकना देण्यात यावी. तसेच वीस टक्के रक्कम शासकीय फंडात जमा करावे, असे न्यायालयाने निकालादरम्यान नमूद केले आहे. दंडाची रक्कम न भरल्यास संजय शिंदे यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news