MITRA Mentoring Pudhari
पिंपरी चिंचवड

MITRA Mentoring Initiative: पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर मेंटॉर होण्याची संधी

केंद्र सरकारच्या ‘मित्रा’ उपक्रमात अनुभवी शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून काम करता येणार; किमान आठ वर्षांचा अनुभव आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शिकवणे फक्त वर्गापुरते मर्यादित न ठेवता, देशभरातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची मोठी संधी आता पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांना मिळाली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'मित्रा' उपक्रमामुळे शहरातील अनुभवी शिक्षक आता राष्ट्रीय पातळीवर मेंटॉर म्हणून काम करू शकणार आहेत.

'मित्रा' म्हणजे 'मेंटॉरिंग इनिशिएटिव्ह फॉर टीचिंग, रिसर्च अँड असेसमेंट'. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) हा उपक्रम राबवत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यात अनुभवी शिक्षक मेंटॉर असतील, तर ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे असे सेवेत असलेले शिक्षक ‘मेंटी’ म्हणून सहभागी होतील. दोघांमधील नियमित संवाद, चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण यातून शिक्षक अधिक सक्षम होतील, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांना देशाच्या वेगवेगळ्या भागांतील शिक्षकांशी जोडले जाता येणार आहे. त्यांच्याकडून नवीन अध्यापन पद्धती शिकता येणार आहेत. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या नव्या विषयांचे ज्ञानही मिळणार आहे. याचा थेट फायदा शेवटी विद्यार्थ्यांनाच होणार आहे, कारण शिक्षक अधिक सक्षम झाले की शिक्षणाचा दर्जाही उंचावतो.

कोण करू शकतो अर्ज?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या संलग्न शाळांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक शाळेने किमान तीन ते पाच अनुभवी शिक्षकांची मेंटॉर म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी शिक्षकाकडे किमान आठ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे गरजेचे आहे. याशिवाय मार्गदर्शन करण्याचे कौशल्य, उत्तम संवादकौशल्य, डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती आणि सक्रियपणे काम करण्याची तयारी असावी लागेल. इच्छुक शिक्षकांना एनसीटीईच्या राष्ट्रीय मेंटरिंग मिशन (एनएमएम) पोर्टलवर नोंदणी करता येईल. महापालिका आणि खासगी अशा दोन्ही शाळांतील पात्र शिक्षकांना ही संधी आहे.

काय शिकवले जाणार?

या उपक्रमात फक्त पुस्तकी विषय नाहीत, तर काळाची गरज असलेले आधुनिक विषयही आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता, कौशल्याधारित शिक्षण, वर्ग व्यवस्थापन, बालविकास, समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य, आर्थिक साक्षरता, मूल्यशिक्षण, अनुभवाधारित शिक्षण, योग व ध्यान यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र या विषयांचे अध्यापनशास्त्रही यात असेल.

केंद्र सरकारचा 'मित्रा' हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील एक दूरदर्शी पाऊल आहे. एक आयडॉल शिक्षक म्हणून मला या निर्णयाचा विशेष आनंद आहे. आजवर वर्गापुरते मर्यादित राहिलेले नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग या उपक्रमामुळे देशभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतील. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेसोबतच मानसिक आरोग्य, मूल्यशिक्षण व योग-ध्यान यांचा समावेश अत्यंत समयोचित आहे. यामुळे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांचे अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. शिक्षकांचे हे सक्षमीकरण अंतिमतः देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल."
दयानंद यादव (आयडॉल शिक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळा काळेवाडी, कन्या)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT