

वर्षा कांबळे
पिंपरी: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने मोठ्या गाजावाजात सुरू केलेली पिंक ई-रिक्षा योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कागदावर ही रिक्षा महिलेच्या नावावर असते, अनुदान महिलेला मिळते, पण रस्त्यावर मात्र ती रिक्षा पुरुषच चालवताना दिसत आहेत. आरटीओकडे पिंपरी-चिंचवड शहरात ३३ महिलांची पिंक ई-रिक्षा साठी नोंदणी झाली आहे. एवढ्या अल्प प्रमाणात नोंदणी होऊनही काही गरजू महिला सोडल्या तर पिंक रिक्षांचे स्टिअरिंग पुरुषांच्या हातीच दिसत आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या १७ शहरांमध्ये ही योजना राबवली जात आहे. यामध्ये २० टक्के अनुदान सरकारचे, ७० टक्के बँकेचे कर्ज आणि फक्त १० टक्के रक्कम महिलेला भरायची आहे. अट एकच होती - रिक्षा महिलेनेच चालवायची. अर्ज करताना 'मी स्वतः रिक्षा चालवणार' असे हमीपत्रही महिला आणि बालकल्याण विभागातर्फे महिलांकडून घेतले जाते. पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. सकाळी स्टेशन, मेट्रो स्टेशन, मार्केट, हॉस्पिटल परिसरात उभ्या असलेल्या अनेक पिंक रिक्षांवर पुरुष चालक दिसतात. कोणी पती, कोणी भाऊ, कोणी मुलगा, तर कोणी भाडेकरू चालक रिक्षा चालवत आहे. महिला घरीच आहे आणि पुरुष तिच्या नावावर मिळालेल्या रिक्षावर कमाई करत आहे, असे चित्र आहे.
यामुळे योजनेचा मूळ उद्देशच हरवला आहे. ही योजना केवळ रिक्षा वाटण्यासाठी नव्हती, तर महिलांना रस्त्यावर आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी होती. महिला चालक असल्यावर महिला प्रवाशांना सुरक्षित वाटते, हाही उद्देश होता. पुरुषच चालवणार असेल तर मग सामान्य रिक्षा आणि पिंक रिक्षात फरक काय राहिला, असा सवाल महिला प्रवाशांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे खऱ्या महिला चालक मात्र अडचणीत आहेत.
अनेक महिलांना बँकेचे कर्ज मिळत नाही, चार्जिंग पॉईंट नाही, रिक्षा थांब्याची सोय नाही, रात्री उशिरा सुरक्षितता नाही. त्यामुळे काही महिला नाईलाजाने रिक्षा घरातील पुरुषांकडे देतात, असेही सांगितले जाते. आरटीओ आणि महिला व बालविकास विभागाने यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पोलिस आणि परिवहन विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात तपासणीच होत नसल्याने गैरवापर वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंक ई रिक्षासाठी ३३ महिलांची नोंदणी झालेली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून या रिक्षा देण्यात आलेल्या आहेत. महिलांकडून स्वत: ती रिक्षा चालविणार असे हमीपत्र या विभागास दिले जाते. त्यामुळे रिक्षा कोणी चालवावी हा अधिकार आमच्याकडे नाही.
राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड)
शहरात पिंक ई रिक्षा महिलांनी चालविण्याचे प्रमाण किरकोळ आहे. महिलांच्या घरातील पुरुष चालवितात किंवा काही महिलांनी शिफ्टवरदेखील रिक्षा चालविण्यात दिली आहे. शहरात पिंक ई रिक्षासाठी जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. परवाना मिळण्यात अडचणी, चार्जिंग स्टेशनची अपुरी उपलब्धता, प्रशिक्षण देण्याबाबत टाळाटाळ त्यामुळे पिंक ई रिक्षाची नोंदणी खूप कमी प्रमाणात आहे.
काशीनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ