मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या आठ जागा 30 वर्षे भाडेतत्त्वावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) दिल्या आहेत. आता त्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा महामेट्रोला बिनशर्त मालकी (फ—ी होल्ड) हक्काने देण्याचा आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिला आहे. त्यामुळे त्या आठ जागेचा मालक आता महामेट्रो असणार आहे. त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधून महामेट्रोच्या तिजोरीत भरघोस उत्पन्न जमा होणार आहे.
शहरात पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी अशी मेट्रो धावत आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी महापालिकेने आठ जागा महामेट्रोला 30 वर्ष भाडे तत्त्वावर दिल्या आहेत. त्या ठिकाणी पार्किंग विकसित करण्याची, व्यावसायिक उपयोग न करण्याची अट महापालिकेने घातली होती. तीस वर्षांचे एकूण भाडे रक्कम महापालिकेचा हिस्सा म्हणून महामेट्रोकडे समायोजित करण्यात आली आहे.
महामेट्रोने प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेतले आहे. कर्जाची नियमित परतफेड तसेच, मेट्रो संचलन, दुरुस्ती व देखभालीचा खर्च भागविण्यासाठी महापालकिच्या त्या जागांचा व्यावसयिक कारणांसाठी वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या जागा महामेट्रोला बिनशर्त मालकी हक्काने मिळाव्यात, अशी विनंती महामेट्रोने राज्य शासनाकडे केली होती.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 450 अ अन्वये राज्य शासनास प्राप्त अधिकारानुसार महापालिकेने त्या आठ जागा बिनशर्त मालकी हक्काने महामेट्रोस देण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. त्या जागेच्या अधिमूल्याची रक्कम या प्रकल्पाच्या वित्तीय सहभाग आराखड्यानुसार महापालिकेने द्यावयाच्या वित्तीय सहभागामध्ये समायोजित केली जाणार आहे. या निर्णयानुसार महापालिकेने महामेट्रोला त्या आठ जागा बिनशर्त मालकी हक्काने देण्याबात तात्काळ कार्यवाही करावी. त्या जागा महामेट्रोने व्यावसायिक हेतूनेच वापराव्यात. जागेचा वापर न केल्यास त्या पुन्हा महापालिकेस बिनशर्त परत करण्यात याव्यात, असे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशात नमूद केले आहे. या निर्णयाामुळे महापालिकेच्या आठ जागांची मालकी आता महामेट्रोकडे असणार आहे.
पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. त्या मार्गिका तसेच, स्टेशनसाठी महामेट्रोला महापालिकेने 11 जागा 30 वर्षे भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ 4,883.233 चौरस मीटर इतके आहे. त्या जागा भाडे तत्त्वाऐवजी बिनशर्त मालकी हक्काने देण्याची मागणी महामेट्रोने केली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार त्या जागाही महामेट्रोच्या मालकी होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेचा आठ जागांचा मालकी हक्क महामेट्रो मिळेल, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांनी सांगितले.