Kalewadi Police Station Pudhari
पिंपरी चिंचवड

Kalewadi Police Crime Action: 'मोका'च्या ठोक्यामुळे गुन्हेगार 'अंडरग्राऊंड'; दीड वर्षात काळेवाडी पोलिस ठाण्याचा 'इम्पॅक्ट'

आठ टोळ्यांतील ३२ आरोपींवर मोका; १७ तडीपार, एकावर एमपीडीए

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, तलवारी-कोयते घेऊन धुडगूस घालणे, वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणे, असे प्रकार सर्रास घडणाऱ्या काळेवाडी-रहाटणी परिसरातील गुन्हेगारीवर दीड वर्षापूर्वी कार्यान्वित झालेल्या स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रभाव दिसू लागला आहे.

गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी काळेवाडी पोलिसांनी या कालावधीत आठ गुन्ह्यांतील ३२ आरोपींवर मोका, १७ गुन्हेगारांवर तडीपार आणि एका गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षरशः 'अंडरग्राऊंड' झाल्याचे बोलले जात आहे.

काळेवाडी आणि रहाटणी परिसर पूर्वी वाकड पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत होता. मुख्य पोलिस ठाण्यापासून हा भाग साडेचार किलोमीटर अंतरावर असल्याने गंभीर घटना घडल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस मदत पोहोचण्यास वेळ लागत असे.

दाट लोकवस्ती, वाढता नागरी विस्तार आणि गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यानंतर वाकड पोलिस ठाण्याचे विभाजन करून दीड वर्षापूर्वी काळेवाडी पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले.

स्वतंत्र ठाणे झाल्यानंतर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करणे, त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवणे, संवेदनशील भागात गस्त घालणे, कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे आणि प्रतिबंधात्मक कारवायांना प्राधान्य देण्यात आले.

सतरा जणांना शहराबाहेरचा रस्ता

मोका कारवाईबरोबरच १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार करून शहराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, तर एका गुन्हेगारावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात केवळ गुन्हे दाखल न करता कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने गुन्हेगारांच्या हालचाली थंडावल्या आहेत.

दीड लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी :

काळेवाडी-रहाटणी परिसरात सुमारे दीड लाख नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी काळेवाडी पोलिसांवर आहे. काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत परगाव आणि परराज्यांतून आलेले सुमारे २० ते २५ हजार कामगार राहतात. हे कामगार हिंजवडी, पिंपरी, भोसरी, तळेगाव, महाळुंगे एमआयडीसी तसेच पुणे परिसरात कामासाठी जातात. वाढती लोकसंख्या, व्यापारी आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीमुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे आव्हानात्मक मानले जाते.

..अशी आहे पोलिस ठाण्याची हद्द :

काळेवाडी फाटा, तापकीर चौक, कोकणेनगर, नढेनगर, आदर्शनगर, राजवाडे कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, किनारा कॉलनी, बळीराज कॉलनी, नखातेवस्ती, शिवराजनगर आणि रामनगरसह आसपासचा निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. परिसरात चार शैक्षणिक संस्था, दोन महाविद्यालये, एक वसतिगृह, सुमारे आठ हजार विद्यार्थी, ११ बँका, चार पतपेढ्या, चार पेट्रोलपंप, तीन मॉल, एक मल्टिप्लेक्स, आठ मंगल कार्यालये आणि तीन कारखाने आहेत.

आठ टोळ्यांच्या नांग्या आवळल्या :

प्रशांत भानुदास दिघे (रा. राजवाडेनगर, काळेवाडी), अभिषेक शामराव निंबाळकर (रा. काळेवाडी), सुनील विश्वनाथ ठाकूर ऊर्फ सुनील शेट्टी (रा. जय मल्हारनगर, थेरगाव), वैभव व्यंकट नागझरकर (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी), किशोर गणेश पांचाळ (रा. काळेवाडी फाटा, रहाटणी), विशाल भीमराव कांबळे (रा. श्रीनगर, काळेवाडी), आदर्श अनिल कामठीकर (रा. आंबेगाव, पुणे) आणि विकी शंभूलिंग सुतार (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांच्या टोळ्यांवर मोका कायद्यान्वये कारवाई करून नांग्या आवळण्यात आल्या आहेत.

स्वतंत्र ठाण्यामुळे पोलिसांचा वावर वाढला

काळेवाडीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे झाल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी झाला आहे. स्थानिक गुप्त माहितीचे जाळे मजबूत झाल्याने तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देणे, आरोपींचा शोध घेणे आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, स्वतंत्र ठाण्यामुळे या भागात पोलिसांचा वावर वाढला आहे.

स्वतंत्र काळेवाडी पोलिस ठाणे सुरू झाल्यानंतर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेत सकारात्मक बदल जाणवत आहे. मोका, तडीपार आणि एमपीडीएअंतर्गत झालेल्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. पूर्वी वारंवार होणारी वाहनांची तोडफोड, टोळक्यांचा धुडगूस आणि दहशतीचे प्रकार कमी झाल्याचे नागरिकही सांगत आहेत. पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान असून, ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू रहावी.
- संतोष कोकणे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका
यापूर्वी काळेवाडी परिसरात किरकोळ कारणांवरून टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करणे, हाणामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजविणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. मात्र, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवून मोका, तडीपार, स्थानबद्धता तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, अशा घटनांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला आहे. सध्या काळेवाडी परिसर तुलनेने शांत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरू राहील.
- राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेवाडी पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT