Graduate Teacher Constituency Election Pudha
पिंपरी चिंचवड

Maval Graduate Teacher Constituency Election: मावळात पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी ३,४९९ मतदार; १२ मतदान केंद्रे सज्ज

२३ ऑक्टोबरला मतदान; पदवीधरांसाठी सात, तर शिक्षक मतदारसंघासाठी पाच केंद्रांवर व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, मावळात पदवीधरसाठी २,६७९ ते शिक्षकसाठी ८२० असे एकूण ३ हजार ४९९ मतदार आहेत. मतदानासाठी १२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख व निवडणूक नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी दिली.

या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मावळ तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २ हजार ६७९ मतदार आहेत. यामध्ये १ हजार ५६४ पुरुष आणि १ हजार ११५ महिला मतदारांचा समावेश आहे.

या मतदारांसाठी तालुक्यात सात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघात मावळ तालुक्यात एकूण ८२० मतदार असून, त्यात ४१२ पुरुष आणि ४०८ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी पाच मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

पदवीधरसाठी पवनानगर येथील पवना उच्च माध्यमिक विद्या मंदिर, लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेन्ट हायस्कूल, कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असेल. तसेच, तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा क्रमांक १ येथे तीन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षकसाठी पवनानगर येथील पवना उच्च माध्यमिक विद्या मंदिर, लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेन्ट हायस्कूल, कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा क्रमांक १ येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी निर्धारित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT