वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 9 जागांवर विजय मिळवत मावळ तालुक्याची राजधानी असलेल्या वडगाव शहरात झेंडा फडकवला आहे. दरम्यान, भाजपला 6 जागांवर विजय मिळाला तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नगरपंचायत स्थापनेनंतर दुसऱ्यांदा झालेली सार्वत्रिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. आज नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहायक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.
पहिल्याच फेरीत लागलेल्या 4 प्रभागांच्या निकालामध्ये माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांचा पराभव झाल्याचे व एक उमेदवार अवघ्या एका मताने विजयी झाल्याने पहिली फेरी राष्ट्रवादीच्यादृष्टीने धक्कादायक ठरली. दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या दृष्टीने धक्कादायक ठरला. तसेच, या फेरीत राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष व अपक्ष लढलेले चंद्रजीत वाघमारे यांचा अवघ्या दोन मतांनी झालेली पराभव धक्कादायक ठरला असून, चौथ्या फेरीत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांचा पराभव धक्कादायक होता. भाजपच्यादृष्टीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांचा 1460 मतांनी झालेला पराभव या निवडणुकीच्या दृष्टीने धक्कादायक ठरला.
लोणावळा: लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांनी 10 हजार 681 मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला असून, मागील अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला एक हाती झेंडा नगर परिषदेवर फडकवला आहे. लोणावळा शहरामधील भाजपची सत्ता गेली असून, मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेल्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचादेखील मोठ्या फरकाने येथे पराभव झाला आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानचा आज 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16, भाजप 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जागा, काँग्रेस 3, अपक्ष 3 असे पक्षीय बलाबल लोणावळा नगरपालिकेत निर्माण झाले आहे.
माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचा पराभव
लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचा राष्ट्रवादीच्या आरती तिकोने यांनी 484 मतांच्या फरकाने पराभव केला. सुरेखा जाधव यांना 1026 तर आरती ती तिकोने यांना 1510 मते मिळाली. तुंगार्ली गावातील चार वेळचे अपक्ष नगरसेवक असलेले राजू बच्चे यांनादेखील या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला असून, त्या ठिकाणी मंगेश मावकर हे विजय झाले आहेत.
सोमाटणे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीला 17, भाजपला 10 व अपक्ष 1 जागेवर विजय मिळवता आला. तर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे 11755 मतांनी विजयी झाले. एकूण 28 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी 19 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याने 9 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी 4 नगरसेवक पद व नगराध्यक्षपदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली व उर्वरित 4 प्रभागातील 5 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली.
रविवार (दि. 21) सर्व 9 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महायुतीत ठरल्याप्रमाणे 17-11 हा फॉर्म्युला फेल झाला. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेल्या 11 जागांपैकी 10 जागांवर भाजपला विजय साधता आला. तर प्रभाग क्रमांक 2 अ मधून तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार डॉ. ऋतुजा कल्पेश भगत यांनी भाजपच्या विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांचा पराभव करून विजय मिळविला. अशाप्रकारे राष्ट्रवादी पक्षाला 17, भाजप 10 व अपक्ष 1 जागेवर विजय मिळवता आला. तर, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही एकतर्फी झाल्याचे चिन्ह पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे 11755 मतांनी विजयी झाले.