

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसंदर्भात कर्मचाऱ्यांना शनिवार (दि. 20) पहिले प्रशिक्षण देण्यात आले. हे सत्र चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृह आणि आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे पार पडले.
निवडणुकीसाठी एकूण 4 हजार 765 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 573 अधिकारी, व कर्मचारी प्रत्यक्ष प्रशिक्षणास उपस्थित होते. सकाळी नऊला प्रशिक्षण सत्रास सुरुवात झाली. त्यात ईव्हीएम मशिन, बॅलेट पेपर व मतदान प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
उर्वरित 4 हजार 765 अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवार (दि. 21) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले नाही किंवा प्रशिक्षणास गैरहजर होते, त्यांनी रविवारी प्रशिक्षणास हजर राहून प्रशिक्षण पूर्ण करावे. जे कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहतील, त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 14 (2) (3) (4) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
मतदानाचे तांत्रिक मार्गदर्शन
सादरीकरणाद्वारे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूकविषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती देण्यात आली.
मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत माहिती देण्यात आली. मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परिसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच, मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्याप्रकरणी करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हाताळण्याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामध्ये रामेश्वर पवार, नरेद्र बंड, किशोर शिंदे, आनंदकर यांनी प्रशिक्षण दिले.