

पिंपरी: धावडेवस्ती, गुळवेवस्ती या प्रभागात भाजपाचे वर्चस्व आहे. भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक रवी लांडगेंसह माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, सारिका लांडगे हे भाजपाकडून पुन्हा इच्छुक आहेत. ठोस कामे न केल्याचा आरोप करीत, प्रभाग पिंजून काढत हा प्रभाग ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादी काँग््रेासचा प्रयत्न आहे. बंडखोरी, निष्ठावंतांची नाराजी, अंतर्गत कलहामुळे भाजपाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील निवडणूक भाजपाचे रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले होते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत तिकिटाची मागणी केली होती. मात्र, ती जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने ते लढले नाही. त्यांनी स्वगृही भाजपात प्रवेश केला आहे.
अनुसूचित जाती (एससी) महिला जागा न राहिल्याने भाजपाच्या माजी नगरसेविका यशोदा बोईनवाड यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाकडून रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, तसेच योगेश लांडगे, राहुल लांडगे, रेखा देवकर, नवनाथ लांडगे व त्यांच्या पत्नी व गवळी हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून सारिका लांडगे यांचे पती संतोष लांडगे हे मैदानात आहेत. तसेच, सुनीता गवळी, करिश्मा बढे, योगेश गवळी, विशाल लांडगे हे इच्छुक आहेत. तसेच, शिवसेना, काँग््रेास, मनसेचे इच्छुक आहेत. अंतर्गत कलह, बंडखोरी, निष्ठांवतांची नाराजी आदी कारणांमुळे भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रभागातील परिसर
धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरुनगर इत्यादी.
रस्ते विकसित केले
प्रभागात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. ड्रेनेजलाईन तसेच, पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्याचा सुयोग्यपणे निचरा व्हावा, म्हणून नाले व ड्रेनेजलाईन दुरुस्त करून घेण्यात आली आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
रेड झोन, पीएमआरडीएमुळे विकासकामे ठप्प
प्रभागातील निम्मा भाग रेड झोनबाधित आहेत. तर, उर्वरित भाग पीएमआरडीए क्षेत्रातील आहे. त्यामुळे प्रभागात कामे करण्यास खूप मर्यादा येत असल्याचे माजी नगरसेवकांना मूलभूत नागरी सुविधा सोडून मोठी कामे करता येत नाही. जागा ताब्यात न आल्याने रस्त्यांची कामे अडकून पडली आहेत. रेड झोन क्षेत्र असले तरी, अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकामे करून तेथील सदनिका सर्वसामान्यांच्या माथी मारल्या जात आहेत. दिवसाआड पाणी येत असल्याने अनेकदा कमी दाबाने पाणी येते. अनेक भागांत ड्रेनेजलाईन तुंबत असल्याने पावसाळ्यात रस्ते व घरात पाणी साचते. उड्डाण पुलाखाली अधिकृत विक्रेत्यांमुळे तसेच, पीएमपी बस व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. अरुंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. या भागांतील वर्कशॉपमुळे ध्वनी व वायू प्रदूषण होते. अवजड वाहनांमुळे रस्ते खराब झाले आहेत.