Maval Taluka Psnchayat Samiti Election Result Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Taluka Psnchayat Samiti Election Result: मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय; जिल्हा परिषद–पंचायत समितीत १५-० क्लीन स्वीप

२५ वर्षांची भाजप सत्ता संपुष्टात; पल्लवी दाभाडेंचा ६०९ मतांनी विजय, सुनील शेळकेंचा करिष्मा कायम

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 अशा सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला. 15 -0 अशी जोरदार बाजी मारत भाजपची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तालुक्यातील टाकवे बुद्रुक-नाणे, इंदोरी-वराळे, खडकाळा-कार्ला, कुसगाव बुद्रुक-काले व सोमाटणे-चांदखेड या पाच जिल्हा परिषद गटांसाठी टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, वराळे, खडकाळा, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले, सोमाटणे, चांदखेड या दहा पंचायत समितीच्या जागांसाठी शनिवार (दि. 7) निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. सोमवार (दि. 9) सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील नूतन इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.

पल्लवी दाभाडे-मेघा भागवत यांच्यात अखेरपर्यंत चुरस

गेली दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची जय्यत तयारी करून ऐनवेळी भाजपच्या उमेदवार झालेल्या मेघा भागवत व राष्ट्रवादीच्या उमेदवार पल्लवी दाभाडे यांच्यात उमेदवारीपासूनच संघर्ष सुरू झाला. त्यानंतर प्रचारही संघर्षमय झाला होता. आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये दाभाडे या आघाडीवर होत्या. 11 व्या फेरीला भागवत यांनी 2 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीत चढाओढ सुरू होती. अखेरच्या फेरीत दाभाडे या 609 मताधिक्यांनी विजयी झाल्या, परंतु भागवत यांनी हरकत घेतल्याने पुन्हा काही मतपेट्यांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे दाभाडे व भागवत यांची झुंज अखेरपर्यंत सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे 609 मतांनी विजयी

सुरुवातीला टपाली मतदानाने मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यानंतर फेरीनिहाय मतमोजणी पार पडली. यामध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये सोमाटणे पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव कारके वगळता इतर सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर होते. त्यानंतर साहेबराव कारके यांनीही आघाडी घेतली. तसेच, सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार पल्लवी दाभाडे या आघाडीवर होत्या. दरम्यान, अकराव्या फेरीत भाजपच्या उमेदवार मेघा भागवत यांनी दोन मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दाभाडे व भागवत यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे या 609 मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

विजयी उमेदवारांची भंडाऱ्याची उधळण

मतमोजणी निकालानुसार टाकवे-नाणे गटातील तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून, त्याखालोखाल सोमाटणे चांदखेड व कुसगाव-काले या गटातील उमेदवारही मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तसेच खडकाळे-कार्ला जिल्हा परिषद गट व खडकाळा पंचायत समिती, इंदोरी व वराळे पंचायत समिती गणाचे उमेदवार ही विजयी झाले आहेत. एकंदर, मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला भरघोस निधी, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत झालेल्या विकासाला कौल देत अजित पवार यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली समर्पित केली असल्याचे पहायला मिळाले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडारा व गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अजित पवार यांनी माझ्या मावळ तालुक्यावर भरभरून प्रेम केले, मागेल ते दिले, कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे तालुक्याच्या वाड्या-पाड्यापर्यंत विकास करता आला. नवनवीन प्रकल्प आणता आले. मावळच्या जनतेने याचीच जाण ठेवून विरोधकांचा सुपडा साफ करत मोठा विश्वास दाखवला आहे. या विजयाच्या शिल्पकार असलेल्या मावळच्या जनतेने दादांनी केलेल्या प्रेमातून उतराई होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या माझ्या मावळच्या जनतेला माझा मानाचा मुजरा.
सुनील शेळके, आमदार
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात गेल्या सहा वर्षांत झालेल्या विकासाला मावळच्या जनतेने कौल दिला आहे. एकप्रकारे दादांच्या प्रति सहानुभूती व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना माझ्याच तालुक्यात मिळालेला एकहाती विजय अभिमानास्पद आहे.
विठ्ठलराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्व जागांवर बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मावळ पंचायत समितीवर 25 वर्षांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. हा विजय आम्ही अजितदादांना समर्पित करतो.
गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT