

पिंपरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्यामार्फत बारावीची परीक्षा मंगळवार (दि. 10) पासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा पारदर्शक, कॉपिमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यभरात ‘कॉपिमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयच्या कार्यक्षेत्रात दहावीच्या परीक्षासाठी 73, तर बारावीची परीक्षासाठी 42 केंद्र असणार आहेत.
कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, एसटीडी, फॅक्स, ध्वनिक्षेपक आदी सुविधा परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्रात मोबाइल, ब्लूटूथ, पेजर, इंटरनेटसह कोणत्याही दूरसंचार साधनांवर कडक बंदी असेल. कॉपिमुक्त अभियान च्या अनुषंगाने इयत्ता बारावी व दहावी बोर्ड परीक्षा कॉपिमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गैरप्रकार आढळल्यास थेट गुन्हा होणार दाखल
पोलिस आयुक्तालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत मनाई आदेश जारी केला असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी तसेच आवश्यकतेनुसार व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.कॉपी, कॉपीस मदत किंवा गैरप्रकारात सहभागी आढळणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.