गणेश विनोदे
वडगाव मावळ: उच्च माध्यमिक (५वी) व पूर्व माध्यमिक( ८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील परीक्षा दिलेल्या एकूण ५०८३ विद्यार्थ्यांपैकी अवघे १२७२ विद्यार्थी पास झाले असून, तब्बल ३८११ विद्यार्थी नापास झाले आहेत. गुणवत्ता यादीमध्ये खासगी शाळांचे ५८ व जिल्हा परिषद शाळांचे अवघे ९ विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे मावळची शैक्षणिक गुणवत्ता नक्की कुठे चालली आहे? हा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेचा तर कळसच झाला असल्याचे दिसते.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळली
दैनिक पुढारी मावळ तालुक्यातील विशेषतः शिष्यवृत्ती परीक्षेचा आढावा
दरवर्षी सातत्याने घेत असून, या परीक्षेतील वाढत चाललेली टक्केवारी गेल्या तीन वर्षांपासून पुन्हा घसरत चालली असल्याचे दिसते. सन २०२४ मध्ये जिल्हा परिषद शाळांचे १५ व खासगी शाळांचे २० असे ३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. सन २०२५ मध्ये जिल्हा परिषद शाळांची १७ व खासगी शाळांचे ४७ असे एकूण ६४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. यावर्षी यामध्ये ३ विद्यार्थ्यांची भर पडली असली तरी जिल्हा परिषद शाळेचा आकडा मात्र निम्म्याने कमी झाल्याचे दिसत आहे.
पाचवीतील तब्बल १६०७ विद्यार्थी नापास
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वीच्या २०२४ पैकी फक्त ४१७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर, तब्बल १६०७ विद्यार्थी नापास झाले आहेत. इयत्ता ८ वीच्या परीक्षा दिलेले सर्व ४२ विद्यार्थी नापास झाले आहेत. खासगी शाळांतील इयत्ता ५ वी च्या १५०६ पैकी ५६८ विद्यार्थी पास तर ९३८ विद्यार्थी नापास झाले आहेत. इयत्ता ८ वीचे १५११ पैकी अवघे २८७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर, १२२४ विद्यार्थी नापास झाले आहेत. एकंदर, दैनिक पुढारीने घेतलेल्या गेल्या ५ ते ६ वर्षातील आढाव्यानुसार सन २०२३ पर्यंत निकाल काही प्रमाणात का होईना वाढत गेला; परंतु सन २०२४ मध्ये तो पुन्हा घसरला असून, सन २०२५ मध्ये पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था झाली होती. यावर्षीही निकाल जवळपास जागेवरच आहे, परंतु जिल्हा परिषद शाळेची स्थिती मात्र निम्म्याने घटली असल्याचे दिसते. यामुळे पालकवर्गांतून चिंता व्यक्त केली जात असून, जिल्हा परिषद शाळेच्या दर्जात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या २२ तर खासगी ४५ शाळांचा निकाल शून्य टक्के
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ वीच्या १८ व इयत्ता ८ वीच्या ४ अशा एकूण २२ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, खासगी शाळांमध्ये इयत्ता ५ वीच्या १७ व इयत्ता ८ वीच्या २८ अशा एकूण ४५ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ वीच्या किवळे, कल्हाट, आंबळे, उकसान, सांगिसे, टाकवे खुर्द, साई, चिखलसे, अहिरवडे, ब्राम्हणवाडी, थुगाव, शिवणे, शिंदेवस्ती (शिवणे), शिळींब, बधलवाडी, म्हस्केवस्ती (शिवणे), कुसगाव प. मा., वाघजाई वस्ती (कुसगाव प. मा.) व. इयत्ता ८ वीच्या साई, पिंपळोली, कुणे नामा, खडकाळा उर्दू शाळा या शाळांचा समावेश आहे.
या शाळांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जांभूळ शाळेतील १, कान्हे शाळेतील २, आढे शाळेतील ५ व डोणे शाळेतील १ ही जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर, न्यू इंग्लिश स्कूल, वडगावचे ५, संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव १, सरस्वती विद्या मंदिर २, जैन इंग्लिश स्कूल ७, नवीन समर्थ विद्यालय २, परुळेकर विद्यानिकेतन १, इंद्रायणी स्कूल १, आदर्श विद्यामंदिर ४, प्रज्ञान प्रबोधिनी स्कूल, शिरगाव १ हे खासगी शाळांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. पूर्व माध्यमिक परीक्षेत खासगी शाळांचे न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे ४, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव ४, नाणे विद्यालय १, भैरवनाथ विद्यालय, ओझर्डे २, एकवीरा विद्यामंदिर २, छत्रपती शिवाजी विद्यालय १, श्रीराम विद्यालय १, संत ज्ञानेश्वर विद्यालय १, जैन इंग्लिश स्कूल ८, परांजपे विद्यामंदिर २, परुळेकर विद्यानिकेतन १, आदर्श विद्यालय २, अण्णासाहेब चौभे स्कूल १, जैन इंग्लिश स्कूल १, पंडित नेहरू विद्यालय २, गुरुकुल हायस्कूल १ या शाळांचा समावेश आहे.