Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Police Service Medals: मावळच्या तीन पोलिसांचा केंद्र शासनाकडून गौरव; वाघमारे यांना अति उत्कृष्ट, कसबेकर-गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक

३५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसाठी प्रकाश वाघमारे यांचा सन्मान; गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील कामगिरीची दखल

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात पोलिस प्रशासनामध्ये कर्तव्यदक्ष म्हणून काम केलेले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक तर पोलिस हवालदार अमोल कसबेकर व सचिन गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक केंद्र शासनाकडून जाहीर झाल्याने मावळ तालुक्यात विशेषतः पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरले आहे.

प्रकाश वाघमारे यांनी तब्बल ३५ वर्षे कर्तव्यनिष्ठ, गुणवत्तापूर्ण सेवा बजावली आहे. त्यांना यापूर्वी राष्ट्रपती पदकही मिळाले आहे. बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असताना आगीच्या भीषण दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीन नागरिकांचे प्राण वाचवून त्यांनी आपल्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडविले. तसेच, खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. शंभरहून अधिक गावठी पिस्तुले त्यांनी जप्त केली आहेत. तसेच, आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धही त्यांनी उल्लेखनीय कारवाई केली आहे.

सचिन गायकवाड यांचा अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात मोठा सहभाग असून, तांत्रिक तपासात त्यांचे विशेष कौशल्य असल्याने सायबर गुन्ह्याच्या तपासात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे त्यांची सायबर गुन्ह्यांच्या तपासत वेगळी ओळख आहे. यापूर्वी २०२० मध्ये त्यांना पोलिस महासंचालक पदक मिळाले आहे.

तीनही पदक विजेत्यांची वडगाव मावळला सेवा

दरम्यान, उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेले प्रकाश वाघमारे हे यापूर्वी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात बराच कालावधी कार्यरत होते. आता ते लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर, अमोल कसबेकर हे वडगाव मावळ पोलिस ठाण्यात सेवेत असून सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात काम करत आहेत. तसेच, सचिन गायकवाड हेही सद्यस्थितीत वडगाव मावळ पोलिस ठाण्यात आपली सेवा बजावत आहेत. वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून, पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी तिघांचेही विशेष अभिनंदन केले.

कसबेकर यांची गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

अमोल कसबेकर यांनी जिल्हा वाहतूक शाखा, इंदापूर, लोणावळा शहर, वडगाव मावळ पोलीस ठाणे येथे काम केले असून महत्वाच्या व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा कौशल्यपूर्ण तपास केला आहे. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात महत्वपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडली आहे. सन २०२३ मध्ये पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक मिळाले असून गंभीर व गुन्ह्यांच्या तपासातील कौशल्य, कार्यतत्परता आणि अनुभवामुळे पोलीस दलात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT