Vadgaon Nagar Panchayat Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Panchayat Samiti BDO Issue: मावळ पंचायत समितीत ‘नो एन्ट्री’नंतर बीडीओ पुन्हा रजेवर; प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांकडे सूत्रे

पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला लावले होते टाळे; प्रमुख अधिकारी नसल्याने कामकाज विस्कळीत, पूर्णवेळ सक्षम अधिकाऱ्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बीडीओ यांना 'नो एन्ट्री' केल्यानंतर गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी पुन्हा सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारी (दि. १४) पदभार स्वीकारण्यासाठी येणार होते; परंतु त्यांना पदभार घेऊ द्यायचा नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या सभापती दीपाली हुलावळे, सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, गटनेते दिलीप ढोरे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र कडलक, योगेश लोहोर, रेश्मा देवकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे, शैला कालेकर तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे, मनीषा मुऱ्हे यांनी सकाळपासूनच गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडले होते व ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयास टाळे लावले.

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांनी गटविकास अधिकारी प्रधान हे रजेवर गेले. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, प्रमुख अधिकारीच नसल्याने काम कसे करणार? असा सवाल करत गटविकास अधिकारी प्रधान यांची बदली करावी, अशी मागणी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनीच नो एन्ट्री केल्यानंतर गटविकास अधिकारी प्रधान हे पुन्हा वैद्यकीय रजेवर गेले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात यांच्याकडे पुन्हा मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची सूत्रे सोपवली आहेत.

कामकाज झाले विस्कळीत

पंचायत समितीच्या अंतर्गत प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, बांधकाम अशी महत्वाची खाती येतात. तसेच, ग्रामीण भागातील संपूर्ण कारभार ग्रामपंचायत - पंचायत समिती, जिल्हापरिषद या कार्यालयांच्या माध्यमातून चालतो. त्यामुळे अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, परंतु मावळ पंचायत समितीमध्ये प्रमुख अधिकारीच नसल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे.

पंचायत समितीमध्ये सर्व पदाधिकारी नवीन व कार्यक्षम आहेत; परंतु गटविकास अधिकारीच उपस्थित नसल्याने कारभार करणे अवघड होत आहे. त्यामुळे पंचायत समितीला नवीन व कार्यक्षम अधिकारी द्यावेत, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तात्पुरते प्रभारी असलेले सेवक थोरात यांना पूर्ण अधिकारी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुनीता येवले, सभापती, मावळ पंचायत समिती
पंचायत समितीमध्ये नवीन कारभारी आले आणि अधिकारी गायब झाले. त्यामुळे कारभार करणे अवघड झाले असून, ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या पंचायत समितीचा कारभार करण्यासाठी सक्षम गटविकास अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पूर्णवेळ सक्षम अधिकारी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
साहेबराव कारके, उपसभापती, मावळ पंचायत समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT