Maval Nagar Palika Voting Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Nagar Palika Voting: मावळात उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! वडगाव-लोणावळ्यात उत्साही मतदान, तर तळेगावात ‘सावळा गोंधळ’

वडगावात ७३.३३% तर लोणावळ्यात ७१.३४% मतदान; तळेगावात मात्र ४९.२४% घसरलेला टक्का, स्लम भागात पैशांच्या वापराची चर्चा.

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी आज झालेल्या मतदानप्रक्रियेत एकूण 19 हजार 847 मतदारांपैकी 7321 पुरुष व 7232 स्त्री मतदार असे तब्बल 14 हजार 554 मतदारांनी मतदान केले. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीसाठी 73.33 टक्के इतके मतदान झाले असून, सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.

तळेगाव दाभाडेत 49.24 टक्के मतदान

निवडणुकीत सावळा गोंधळ, मतदारांची पळापळ

तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या 125 वर्षांहून अधिक काळातील सर्वाधिक राजकीय व प्रशासकीय सावळागोंधळ ठरलेल्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाकडे निम्म्याहून अधिक मतदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आज मंगळवारी (दि. 2) झालेल्या मतदानाच्या घसरलेल्या टक्क्यावरून स्पष्ट झाले. एकूण 64 हजार 679 मतदारांपैकी केवळ 31 हजार 846 मतदारांनी मोठ्या प्रयासाने मतदानाचा हक्क बजावला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्षपद आणि चार नगरसदस्यांसाठी आज केवळ 49.24 टक्केच मतदान झाले.

लोणावळा शहरात 71.34 टक्के मतदान

34 हजार 511 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोणावळा : लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत 71.34 टक्के मतदान झाले. 34 हजार 511 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 17 हजार 162 पुरुष व 17 हजार 349 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासूनच शहरामध्ये प्रत्येक प्रभागात मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता 7 उमेदवार व सदस्यपदाकरिता 78 उमेदवारांनी आज आपले नशीब अजमावले. तर निवडणुकीकरिता एकूण पुरुष मतदार 24 हजार 120 व स्त्री मतदार 24 हजार 252 आणि इतर 1 असे एकूण मतदार 48373 असून एकूण 13 प्रभागांत 63 मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यापैकी प्रभाग क्र. 9 मधील बुथ क्र.5 (9/5) पिंक बूथ म्हणून तयार करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक सहामधील पाच क्रमांकाचे मतदान केंद्र व प्रभाग क्रमांक आठ येथील एक नंबरचे मतदान केंद्रावर मतदान यंत्र तांत्रिक कारणाने बंद पडल्याने काही काळ येथील मतदान थांबले होते. प्रशासकीय यंत्रणेने या दोन्ही ठिकाणी भेट देऊन ही दोन्ही केंद्रे तात्काळ सुरू केली. सर्व केंद्रांवर सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत फक्त 9.68 टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदार 2779 व महिला मतदार 1905 चा समावेश असून, एकूण मतदान फक्त 4684 झाले आहे. त्यानंतर सकाळी 7.30 ते 11.30 या कालावधीत 22.97 टक्के मतदान झाले यात पुरुष मतदार 6154 व महिला 4956 मतदरांचा समावेश होता. या कलावधीत एकूण 11 हजार 110 मतदान झाले होते.

तिसऱ्या टप्यात सकाळी 7.30 ते 1.30 मतदानाची टक्केवारी 37.70 इतकी झाली. यात एकूण मतदान 19 हजार 205 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 9 हजार 801 पुरुष मतदार व 9 हजार 404 महिला मतदार यांचा समावेश होता. सकाळी 7.30 ते 3.30 या कालावधी 55.86 टक्के मतदान झाले. यामध्ये 13 हजार 458 पुरुष व 13 हजार 562 महिला मतदारांचा समावेश होता. सायंकाळी 5.30 पर्यंत 34 हजार 511 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 17 हजार 162 पुरुष व 17 हजार 349 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 04 मध्ये वादाचा प्रकार घडला होता. या व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत मतदान झाले. स्लम भागात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला असल्याची चर्चा लोणावळ्यात रंगली होती. आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माऊली दाभाडे आदींनी लोणावळ्यात मतदान केंद्रांना भेटी देत मतदानप्रक्रियेचा आढावा घेतला.

लोणावळा पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर, सहाय्यक अशोक साबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मतदानप्रक्रिया पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT