उर्से मावळ: मावळ तालुक्यातील बऊर, करुंज व बाह्मणवाडी येथील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद करण्यात येतील. हा प्रकल्प होणार असून, याबाबत वरिष्ठांना सविस्तर माहिती देऊन अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
मावळ तालुक्यातील बऊर, करुंज व बाह्मणवाडी येथील शेतकरी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, भाजप किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भरत मोरे, संतोष दळवी आदी उपस्थित होते.
मोजणीला विरोध करू नका
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. डुडी यांनी सांगितले की, मोजणी प्रक्रियेला विरोध कोणीही करू नये. जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. या भागात एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणावर विकास होईल. तसेच, स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे सांगत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास संबंधित कार्यालयात त्या नोंदवाव्यात, त्यावर योग्य ती कारवाई करून प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. पारदर्शक प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांचे हित जपावे, अशी भूमिका ग््राामस्थांनी मांडली. दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय देत प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
शेतकऱ्यांचा विरोध कायम
प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला बऊर, करुंज व बाह्मणवाडी परिसरातील ग््राामस्थांनी एकमताने विरोध दर्शविला आहे. एजंटांच्या माध्यमातून होत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली.
ग््राामस्थांनी प्रस्तावित एमआयडीसीला एकमताने विरोध दर्शवत या भागात एजंटगिरीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या दस्ताची नोंदणी बंद व्हावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बऊर हद्दीतील दस्त नोंदी थांबविण्याचे आदेश या वेळी दिले. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत.बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री