वडगाव मावळ: अवघ्या एक वर्षापूर्वी पतीच्या निधनाच्या दु:खातून सावरत संसार उभा करण्याचा प्रयत्न करत असतानाच आज शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत डोळ्यांदेखत घर जळून खाक झाले अन् कुटुंब उघड्यावर पडल्यासारखी हृदयद्रावक घटना मावळ तालुक्यातील बेडसे गावात घडली.
बेडसे येथे शालन दहीभाते यांच्या घरात दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. घर कच्च्या स्वरूपाचे असल्याने तसेच उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरली आणि आगीने उग्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी भीषण होती की संपूर्ण घर काही वेळातच जळून खाक झाले.
या आगीत घरातील धान्य, तांदूळ, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या. अनेक वर्षांच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत नष्ट झाल्याने शालन दहिभाते यांच्यावर पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. पतीच्या निधनानंतर मोठ्या जिद्दीने संसार सांभाळत असलेल्या या महिलेपुढे आता निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
घर जळताना पाहून शालन दहिभाते यांचा आक्रोश उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. एक वर्षापूर्वी पती गमावला आणि आता डोळ्यांसमोर संसार जळताना पाहावा लागला, अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत होते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घर उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
मदतीसाठी ग्रामस्थही सरसावले !
ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण यश आले नाही; परंतु अशा परिस्थितीत मदतीसाठी मात्र ग्रामस्थ सरसावले आहेत. सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बेडसे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आर्थिक मदतीसाठी प्रशासन सतर्क!
या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस प्रशासन तसेच वीज वितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.