अमलीपदार्थ विक्री विरोधात मावळात चळवळ pudhari
पिंपरी चिंचवड

Maval drugs issue: अमलीपदार्थ विक्री विरोधात मावळात चळवळ!

‘पुढारी’च्या वृत्तानंतर लाक्षणिक उपोषण, सह्यांची मोहीम, पोलिस कारवाई अन् जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या खुलेआम अमलीपदार्थ आणि दारूविक्रीसंदर्भात दै. पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर पोलिसांकडून झालेली कारवाई, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिमन्यू शिंदे यांनी केलेले लाक्षणिक उपोषण व एक लाख सह्यांची मोहीम तसेच विविध शाळांमध्ये उपक्रमांद्वारे अमलीपदार्थ विरोधी सुरू असलेली जनजागृती पाहता ‘पुढारी’च्या वृत्तामुळे एकप्रकारे मावळ तालुक्यात अमलीपदार्थ विक्रीविरोधात चळवळ उभी राहिली असल्याचे दिसते. (Pimpari Chinchwad News)

5 ऑगस्ट रोजी ‘मावळात अमलीपदार्थ विक्रीचा सुळसुळाट’ हे विशेष वृत्त प्रसिद्ध करून मावळ तालुक्यात दारू, गुटखा, गांजा, एमडी अशा अमलीपदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून, देहूरोड, सोमाटणे, तळेगाव दाभाडे येथील तळ्याचा परिसर, वडगाव, तळेगाव फाटा, तळेगाव एमआयडीसी या भागात सुरू असलेला वेश्या व्यवसायकडे पोलिस, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, या वृत्ताचे मावळ तालुक्यात तीव— पडसाद उमटल्याचे दिसत असून, पुढारीच्या या वृत्ताचे विशेषतः सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत करून अमलीपदार्थ विक्रीविरोधात कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. भाजपचे मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी थेट स्वातंत्र्यदिनी कामशेत येथील महादेव मंदिरात लाक्षणिक उपोषण करून अमलीपदार्थ विरोधात एक लाख सह्यांची मोहीम सुरू करून एकप्रकारे तालुक्यात एक चळवळच सुरू केली.

शिरगाव पोलिसांनी उर्से टोलनाक्याजवळ फिनोलेक्स कंपनीसमोर एका आरोपीला एमडी पावडर विक्री करताना रंगेहात पकडले त्याच्याकडून सुमारे सव्वालाख रुपये किमतीचे 11.750 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. त्यामुळे ‘पुढारी’च्या वृत्तानंतर पोलिस प्रशासनही अमलीपदार्थ विक्रीविरोधात सतर्क झाल्याचे दिसते.

याशिवाय वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव पोलिस ठाणे व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विद्यार्थ्यांचे रॅली काढून जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे पवनानगर येथे संहिता प्रतिष्ठान, संकल्प इंग्लिश स्कूल, पवना विद्यामंदिर व लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पवनानगर येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात पोलिस प्रशासन, शालेय संस्थांच्या माध्यमातून अमलीपदार्थ विरोधात जनजागृती सुरू असल्याचे दिसते.

एक लाख सह्यांची मोहीम राबविणार : अभिमन्यू शिंदे

अमलीपदार्थ विक्रीविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामशेत येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणास पाठिंबा देत कोंडीबा रोकडे, राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शिंदे, युवराज शिंदे, प्रसाद उंडे, धनराज पिंगळे, रमेश पराठे, सुहास लोणकर, समीर भोसले, अतुल गांधी यांनीही या उपोषणात सहभाग घेतला. तर अनेकांनी भेट ठेवून पाठिंबा दिला. दरम्यान, लाक्षणिक उपोषण ही केवळ सुरुवात आहे. आता अमलीपदार्थ विक्रीविरोधात तालुक्यात एक लाख सह्यांची मोहीम राबवून ती यशस्वी करणार असून, वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याचा इशाराही शिंदे यांनी पुढारीशी बोलताना दिला.

राजकीय पुढार्‍यांचा पुढाकार आवश्यक!

तालुक्यात वाढत चाललेला अमलीपदार्थ व दारू विक्रीचा सुळसुळाट तसेच यामुळे व्यसनाधीन होत चाललेली तरुण पिढी याला आळा घालण्यासाठी केवळ पोलिस प्रशासन किंवा शालेय संस्था, सामाजिक संस्था यावर अवलंबून न राहता तालुक्यातील सर्वपक्षीय पुढार्‍यांनी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या गावात, आपल्या भागात असे प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवणे, गावचे प्रतिनिधी म्हणून अशा प्रकारांना रोखणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही आपल्या मुलांनाही लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT