

पिंपरी : काँग्रेसचे नेते संपूर्ण देशाला सांगत होते की, कुठल्याही परिस्थितीत देशाची फाळणी होऊ देणार नाही, पण फाळणी तर झाली. 15 ऑगस्ट 1947 ला देशाची जी फाळणी झाली, ती त्या वेळच्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या चुकांमुळे झाली, असे मत स्वातंत्र्य पर्वाचे अभ्यासक हेमदेव थापर यांनी व्यक्त केले. (Pimpari Chinchwad News)
भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत विभाजन विभिषिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोरेश्वर शेडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजू दुर्गे, शीतल शिंदे, राजेश पिल्ले, केशव घोळवे, माजी नगरसेविका ज्योतीका मलकानी, दापोडी मंडल अध्यक्षा अनिता वाळूंजकर, सामाजिक कार्यकर्ते धनराज आसवानी, गोपीचंद आसवानी, मनोहर जेठवानी, नरेश पंजाबी, सुरेश हेमनानी, सुरिंदर मंघवानी, जितेंद्र अडवाणी आदी उपस्थित होते.
या वेळी फाळणीची झळ अनुभवलेले ग्यानचंद असरानी, सुनील केसवानी, भगवानदास खत्री, कन्हैयालाल आचरा, श्रीचंद नागरानी हे नागरिकदेखील उपस्थित होते.
याप्रसंगी शत्रुघ्न ऊर्फ बापूसाहेब काटे यांनी सांगितले की, विभाजन विभिषिका हा दिवस म्हणजे आपल्या पुढे एक धडा आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्यातील हेवेदावे विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आपला देश आत्मनिर्भर व्हावा, यासाठी एकही सुटी न घेता सतत कार्यरत असतात. त्यासाठी आपण एकत्र राहून प्रयत्न केले पाहिजेत.
हेमदेव थापर म्हणाले की, आधी संपूर्ण भारतात 547 राजे होते. बि—टिश सरकारने या राज्यांना त्यांनी वेगळा देश मागावा, यासाठी प्रयत्न केला; परंतु ही मागणी त्या राजांनी मान्य केली नाही आणि एकीकडे काँग्रेसचे नेते संपूर्ण देशाला सांगत होते की, कुठल्याही परिस्थितीत देशाची फाळणी होऊ देणार नाही, पण फाळणी तर झाली. त्या वेळी 1946 अखिल भारतीय मुस्लिम लिगने डायरेक्ट अॅक्शन डे जाहीर केला. बंगालमध्ये अत्याचार सुरू केले आणि दोन राष्ट्रे करा अशी मागणी केली.
एक मुस्लिम लोकांसाठी आणि एक हिंदू लोकांसाठी आणि नेमका हाच त्या वेळच्या चर्चिल यांचा हाच होरा होता आणि मग शेवटी 14 ऑगस्ट 1947 ला देशाची फाळणी झाली, आणि तरीसुद्धा देशातील मुस्लिम दुसर्या देशात जायला तयार नव्हते. त्यानंतर अखिल भारतीय मुस्लिम लिगचे नेते महंमद अली जिना यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेला महात्मा गांधीनी तयारी दाखवली; परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला. महंमद अली जिना पाकिस्तानमध्ये गेले.
त्याच फाळणीच्या दिवसांपासून पाकिस्तानमधील हिंदूंसोबत अत्याचार करून कत्तल करण्यास सुरुवात झाली. त्या कत्तलीमध्ये मृत झालेल्यांचे मृतदेह रेल्वेमध्ये ठेवून भारतात पाठवण्यास सुरुवात झाली. त्यातूनही काही तेथील सिंध आणि पंजाब या प्रांतातील कट्टर हिंदू आणि शीख आपले जीव वाचवून भारतात आले; परंतु त्यांना काँग्रेसकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आले आणि संघाने मदत केली.