Vadgaon Nagar Panchayat Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval BJP Core Committee: पराभवानंतर मावळ भाजपचा मोठा निर्णय; कोअर कमिटी बरखास्त

नव्या कमिटीत तरुणांना संधी; पक्षाची सूत्रे ज्येष्ठांकडून नव्या पिढीकडे जाणार

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मावळ भाजपने अखेर आत्मचिंतन करत पक्ष संघटनेत सर्वांधिकार असणारी कोअर कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कोअर कमिटीमध्ये तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेत एक प्रकारे पक्षाची सूत्रे ज्येष्ठांकडून तरुणांकडे सोपवून भाकरी फिरवण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

मावळात भाजपच्या हातात एकही सत्ताकेंद्र राहिले नाही

तब्बल 25 वर्षे सलग मावळ विधानसभा, मावळ पंचायत समितीमध्ये असलेली सत्ता, तसेच लोणावळा नगर परिषदमध्ये असलेली एकहाती सत्ता भाजपने गमावली, याशिवाय तळेगाव नगर परिषदमध्ये भाजपचे नगराध्यक्ष असले तरी ते महायुतीचे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले असून, केवळ 10 नगरसेवक राहिले. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही. एकंदर यासर्व पराभवामुळे भाजपच्या हातात एकही सत्ताकेंद्र राहिले नाही. त्यामुळे विशेषतः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर मावळ तालुका कमळमुक्त झाल्यासारखी अवस्था झाली असून, पराभवाचे आत्मचिंतन आणि ठोस निर्णय घेण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली.

या पार्श्वभूमीवर धुलीवंदनाच्या दिवशी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांच्यासह सर्व सदस्य, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष, तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार यांच्या उपस्थितीत मावळ भाजपची विशेष बैठक पवनानगर येथे झाली.

दैनिक ‌‘पुढारी‌’ने मांडली होती आत्मचिंतन करण्याची गरज

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 15-0 असा निकाल लागल्यानंतर दैनिक पुढारीने ममावळात भाजपला आत्मचिंतनाची गरजफ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताच्या माध्यमातून सन 2019 पासून मावळ तालुक्यातील भाजप नेत्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका व निर्णय तसेच गेल्या सात वर्षांत पक्षाला आलेले अपयश याबाबत सविस्तर मांडणी केली होती. त्यानुसार मावळ भाजपच्या या बैठकीमध्ये पराभवाचे आत्मचिंतन करून काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तरुणांचा सहभाग वाढणार

या बैठकीत सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला आलेले अपयश याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दरम्यान, या वेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांनी स्वतःहून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व पक्षाची कोअर कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोअर कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेताना नव्या कोअर कमिटीमध्ये तसेच, पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तालुक्यातील तरुणांना सहभागी करून घेण्याचा महत्वाचा निर्णय या वेळी झाला असल्याचे समजते. त्यामुळे मावळ भाजपने झालेल्या पराभवानंतर पक्षाचे अधिकार ज्येष्ठांकडून तरुणांकडे सोपवत एकप्रकारे भाकरी फिरवण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

पक्षातील गद्दारांवर होणार कारवाई ?

प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करण्यात येत होती. या बैठकीत पक्षातील गटबाजी, गद्दारांमुळे झालेला पराभव याविषयी विशेष चर्चा झाली. तसेच, अशा गद्दारांवर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सबंधित गद्दारांची नावे पाठविण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT