

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अद्याप 2 लाख 12 हजार 440 मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरलेला नाही. थकीत मालमत्ताकर वसुलीस गती देण्यासाठी रविवार (दि.1) पासून अभय योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जागा यांची थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब दंडावर 90 टक्के सवलत दिली जाणार आहे. थकबाकीदारांनी 31 मार्चपूर्वी बिल भरुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
महापौराच्या दालनात नुकत्याच झालेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते.
महापौर लांडगे यांनी सांगितले की, शहरातील 5 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत सुमारे 747 कोटी रुपयांचे मालमत्ताकराचे बिल भरले आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी करसंकलन विभागाच्या 18 विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत आहेत. थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच, वर्तमानपत्र, सोशल मीडिया व विविध माध्यमातून मालमत्ताकर भरण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी थकबाकीसह संपूर्ण बिल भरू या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
31 मार्चनंतर नियमित वसुली मोहीम
एक ते 31 मार्च या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर 90 टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू असून, थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
तब्बल 1 हजार 232 कोटी रुपयांची थकबाकी
शहरातील 2 लाख 12 हजार 440 मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ताकर भरलेला नाही. त्यात निवासी मालमत्ता सर्वांधिक 1 लाख 80 हजार 27 इतक्या असून, थकबाकी तब्बल 404 कोटी 75 लाख इतकी आहे. तर, बिगरनिवासी 18 हजार 284 मालमत्ताधारकांकडे एकूण 341 कोटी 58 लाखांची थकबाकी आहे. पाच हजार 233 मिश्र मालमत्ताधारकांकडे 5 हजार 233, एक हजार 341 औद्योगिक मालमत्ताधारकांकडे 18 कोटी 2 लाख, पाच हजार 308 मोकळ्या जमीनधारकांकडे एकूण 374 कोटी 41 लाख आणि इतर 247 जणांकडे 40 लाखांची थकबाकी आहे. या सर्वांनी थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर 31 मार्चच्या आत भरल्यास महापालिकेकडून सुमारे 42 कोटी रुपयांची सवलत महापालिकेकडून दिली जाणार आहे.